विद्यार्थ्यांचे लसीकरण करून शाळा उघडण्याची परवानगी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 00:44 IST2021-07-13T22:59:27+5:302021-07-14T00:44:16+5:30
दिंडोरी : जिल्हा परिषदेतील सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण करून कोरोनामुक्त गावांतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरू करण्यास प्रशासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी दिंडोरी तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने तहसीलदार पंकज पवार यांच्याकडे करण्यात आली.

विद्यार्थ्यांचे लसीकरण करून शाळा उघडण्याची परवानगी द्या
दिंडोरी : जिल्हा परिषदेतील सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण करून कोरोनामुक्त गावांतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरू करण्यास प्रशासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी दिंडोरी तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने तहसीलदार पंकज पवार यांच्याकडे करण्यात आली.
दिंडोरी तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष सचिन वडजे, सरचिटणीस योगेश बच्छाव, कोषाध्यक्ष मधुकर आहेर यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार पंकज पवार यांची भेट घेऊन यासंदर्भातील मागणीचे निवेदन दिले.
शिक्षण विभागामार्फत ४५ दिवसांचा ब्रिज कोर्स - सेतू अभ्यासक्रम उपक्रम सुरू असून विद्यार्थी शाळेत नसल्याने हा उपक्रम राबवताना शिक्षकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ग्रामीण भागातील मुलांना ऑफलाईन शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही व मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शाळा सुरू होणे आवश्यक आहे. सर्व शिक्षक शाळेवर दररोज उपस्थित राहत आहेत. मात्र विद्यार्थीच नसल्याने अध्ययन-अध्यापन प्रक्रिया घडण्यात अडथळे येत आहेत.
त्यामुळे शासनाने सर्व विद्यार्थ्यांचे १०० टक्के लसीकरण पूर्ण करून कोरोनामुक्त गावांमधील शाळा आवश्यक नियम घालून देऊन तात्काळ सुरू करण्याचे लेखी आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र तत्पूर्वी विद्यार्थी व शिक्षकांना कॅशलेस मेडिक्लेम विमा संरक्षण देखील देण्यात यावे, अशीही मागणी नोंदविण्यात आली आहे. यावेळी तहसीलदार पंकज पवार यांनी, शासनदरबारी याबाबत पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन दिले.
यावेळी निवेदन देताना तालुका संपर्क प्रमुख कल्याण कुडके, दिंडोरी पतसंस्था उपाध्यक्ष विलास पेलमहाले आदी पदाधिकारी उपस्थित होते.