छुप्या पद्धतीने परराज्यातून मद्य वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 00:57 IST2019-10-14T22:53:54+5:302019-10-15T00:57:20+5:30
दादरा नगरहवेली, दीव-दमण यांसारख्या केंद्रशासित प्रदेशात विक्रीस मान्यता असलेला मद्यसाठा राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित आहे. सिल्व्हासा येथून अशाच प्रकारच्या विविध ब्रॅण्डच्या मद्याच्या एकूण ३७९ बाटल्यांची नाशिकमार्गे गुजरातच्या दिशेने होणारी चोरटी वाहतूक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक-१ने वाघेरा-हरसूल रस्त्यावर रोखली.

छुप्या पद्धतीने परराज्यातून मद्य वाहतूक
नाशिक : दादरा नगरहवेली, दीव-दमण यांसारख्या केंद्रशासित प्रदेशात विक्रीस मान्यता असलेला मद्यसाठा राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित आहे. सिल्व्हासा येथून अशाच प्रकारच्या विविध ब्रॅण्डच्या मद्याच्या एकूण ३७९ बाटल्यांची नाशिकमार्गे गुजरातच्या दिशेने होणारी चोरटी वाहतूक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक-१ने वाघेरा-हरसूल रस्त्यावर रोखली. चोरट्या पद्धतीने महिंद्र जीपमध्ये दडवून वाहून नेणारा मद्यसाठा जप्त केला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग सतर्क झाला असून, शहरासह जिल्ह्याच्या वेशीवर तात्पुरत्या स्वरूपात स्थिर सीमावर्ती नाके कार्यान्वित करण्यात आली आहेत. तसेच गस्ती पथकदेखील सक्रिय असून, भरारी पथक क्रमांक-१चे निरीक्षक मधुकर राख यांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे त्यांनी गिरणारे-हरसूल मार्गावर वाघेरा फाटा येथे सापळा रचला. एका चारचाकी जीपमधून चोरट्या पद्धतीने मद्यवाहतूक केली जाणार असल्याची खात्रीशीर माहिती त्यांच्याकडे होती. त्यानुसार दुय्यम निरीक्षक प्रवीण मंडलिक, जवान अरुण सुत्रावे, श्याम पानसरे, धनराज पवार, विलास कुवर आदींनी सापळा रचला. गिरणारे शिवारातून महिंद्र बोलेरो जीप (जीजे १४ एक्स ६३९३) यावर पथकाला संशय आला. पथकाने जीप रोखून जीपची बारकाईने पाहणी करताना कर्मचाऱ्यांना चेसीच्या खाली (बॉडीमध्ये) मागील बाजूने चोरटी जागा खास तयार करून घेतली गेली आहे. त्यामुळे पथकाचा संशय बळावला. गुजरात राज्यातील गीर सोमनाथ जिल्ह्याचा रहिवासी असलेला जीपचालक फरीदभाई रखाभाई उनडजाम (३७) यास ताब्यात घेतले असता त्याने त्या चोरट्या जागेत मद्याच्या बाटल्या असल्याची कबुली दिली. पथकाने तत्काळ जीपसह चालकास नाशिक येथील कार्यालयात आणून जीपची झडती घेत ती चोरटी जागा उघडली असता त्यामधून विविध ब्रॅण्डच्या तब्बल ३७९ मद्याच्या बाटल्यांचा साठा हस्तगत केला. मद्यसाठा व वाहन असा एकूण १० लाख ५ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास राख करीत आहेत.
मासे वाहतुकीचा बनाव
थर्माकोलच्या खोक्यांना माशांचा वास लागलेला असल्यामुळे तपासणी नाक्यांवर कर्मचाऱ्यांना संशय येणार नाही व चोरट्या जागेत दडवून ठेवलेले मद्य सहजरीत्या वाहून नेणे शक्य होईल म्हणून चालक व मालकाने शक्कल लढविली; परंतु क र्मचाºयांच्या सतर्कतेमुळे बनाव फसला. प्रथमदर्शनी जीपमध्ये केवळ थर्माकोलची रिकामी खोकी अस्ताव्यस्त पद्धतीने भरलेली दिसून आली अन् तेथेच चोरट्या मद्य वाहतुकीचा संशय अधिकच बळावला.