'नवरात्रौत्सवात दंगली झाल्यास शासन जबाबदार'; प्रवीण तोगडियांचा इशारा, इतर धर्मियांना गरब्यात येण्याला विरोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 17:04 IST2025-09-22T16:58:49+5:302025-09-22T17:04:38+5:30
नवरात्रौत्सवात हिंदूंनाच मंदिरात व गरब्यात प्रवेश द्यावा अशी भूमिका प्रवीण तोगडिया यांनी मांडली आहे.

'नवरात्रौत्सवात दंगली झाल्यास शासन जबाबदार'; प्रवीण तोगडियांचा इशारा, इतर धर्मियांना गरब्यात येण्याला विरोध
Pravin Togadia on Garba : नवरात्रोत्सवातील गरब्यावरुन नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे. नवरात्रौत्सवात गरबा खेळण्यासाठी केवळ हिंदूंनाच प्रवेश देण्यात यावा, अशी स्पष्ट भूमिका विश्व हिंदू परिषदेने मांडली आहे. त्यानंतर आता नवरात्रौत्सवात हिंदूंनाच मंदिरात व गरब्यात प्रवेश द्यावा, इतर धर्मियांना प्रवेश नको, असं मत आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे संस्थापक डॉ. प्रवीण तोगडिया यांनी मांडली आहे. 'आम्ही इतर धर्मियांच्या प्रार्थनास्थळी जात नाही, मग ते आमच्या धार्मिक कार्यक्रमात का यावेत? यामुळे कुठल्याही प्रकारचा आक्षेपार्ह प्रकार घडल्यास दंगली भडकू शकतात आणि त्याची जबाबदारी शासन-प्रशासनावर राहील,' असा इशाराही प्रवीण तोगडिया यांनी दिला.
गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात रविवारी हिंदू हुंकार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलताना प्रवीण तोगडिया यांनी आपली भूमिका मांडली. नवरात्रौत्सवात 'वीर हिंदू-विजेता हिंदू' अभियान देशभर राबवले जाणार आहे. आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद आणि राष्ट्रीय बजरंग दलातर्फे या अभियानाअंतर्गत विजयादशमीच्या दिवशी प्रत्येक मंदिरात शस्त्रपूजन करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. 'ज्या ठिकाणी देवीसमोर गरबा साजरा केला जातो, तिथे शस्त्रपूजन करण्यात यावे,' असेही प्रवीण तोगडिया यांनी स्पष्ट केले.
तसेच अतिवृष्टीमुळे शेतकरी आत्महत्या करण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे शासनाने तातडीने नुकसानभरपाई द्यावी. यासोबतच दर शनिवारी प्रत्येक मंदिरात हनुमान चालीसाचे पठण करण्याचे आवाहनही त्यांनी केले. तसेच आगामी सिंहस्थात आम्ही आमचे योगदान देणार असून साधु महंतांसाठी आवश्यक असलेल्या सुविधा देण्यासाठी त्वरित प्रयत्न करावा, अशी मागणीही त्यांनी केली. राज्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या म्हणजे संभाव्य आत्महत्या टळतील, असा सल्ला त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला.
शनिवारी हनुमान चालिसा, घरोघरी त्रिशूल वाटप...
हिंदूंचे संघटन होण्यासाठी दर शनिवारी हनुमान मंदिरांमध्ये एकत्र येत हनुमान चालीसाचे पठण करा, त्यासाठी कॉलनीतील हिंदूंना एकत्र करा, असे आवाहनही त्यांनी केले. यासोबत नवरात्रीमध्ये शस्त्रपूजनासाठी परिषदेच्या वतीने त्रिशूल वाटणार असल्याचे डॉ. तोगडिया यांनी जाहीर केले. हिंदूंची लोकसंख्या कमी होणे संकटाला आमंत्रण देण्यासारखे आहे. त्यामुळे प्रत्येक घरात किमान तीन मुलांना जन्म घालणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.