फसवणुकीला लगाम घालणार; थेट कायदा करणार; शेतकऱ्यांसाठी कृषीमंत्री कोकाटेंची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 22:19 IST2024-12-25T22:19:13+5:302024-12-25T22:19:48+5:30

नाशिक विभाग पोलीस महानिरीक्षक कार्यालयात बुधवारी दुपारी द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती.

Agriculture Minister manikrao Kokate big announcement for farmers | फसवणुकीला लगाम घालणार; थेट कायदा करणार; शेतकऱ्यांसाठी कृषीमंत्री कोकाटेंची मोठी घोषणा

फसवणुकीला लगाम घालणार; थेट कायदा करणार; शेतकऱ्यांसाठी कृषीमंत्री कोकाटेंची मोठी घोषणा

Manikrao Kokate: शेतकऱ्यांची द्राक्षासह शेतीमाल विक्रीतून वेळोवेळी होणारी फसवणूक टाळण्यासाठी पणन मंत्री यांच्याशी चर्चा करून सवर्कष स्वरूपाचा कायदा तयार करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे. तसंच शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या द्राक्ष व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करून गुन्हे दाखल करावेत, असे निर्देश ॲड. कोकाटे यांनी दिले आहेत. नाशिक विभाग पोलीस महानिरीक्षक कार्यालयात बुधवारी दुपारी द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.  

माणिकराव कोकाटे म्हणाले की, "शेतकरी हा पूर्णत: शेतात पिकणाऱ्या पिकांवर अवलंबून असतो. शेतीमालाला योग्य भाव मिळेल त्या ठिकाणी तो शेतीमालाची विक्री करत असतो. काही वेळेस फसवणुकीच्या घटना घडतात. यासाठी शेतकऱ्यांना जो व्यापारी माल घेणार आहे, त्या व्यापाऱ्याची माहिती असणे आवश्यक आहे. फसवणूक करणाऱ्या संशयित आरोपींची पोलिसांनी सखोल चौकशी करावी. याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृतीसाठी कृषी विभागातर्फे मोहीम राबविण्यात येईल. शेतकऱ्यांची फसवणुकीपोटी झालेल्या ४६ कोटी रूपयांच्या वसुलीसाठी सर्व सहकार्य करण्यात येईल. तसेच शेतकऱ्यांची फसवणूक व्यापाऱ्यांच्या मालमत्ता सील कराव्यात. याबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली जाईल," असंही मंत्री कोकाटे यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना सांगितले.

विशेष पोलिस महानिरीक्षक कराळे म्हणाले की, शेतकऱ्यांनी फसवणूक प्रकरणी पोलिस अधीक्षक यांची भेट घ्यावी. शेतमाल देताना व्यापाऱ्यांकडून सौदा पावती करून घ्यावी. जेणेकरून फसवणूक झाली, तर कायदेशीर करवाई करता येईल. तसेच व्यापाऱ्यांची पार्श्वभूमी समजावून घ्यावी. कृषी विभाग, द्राक्ष बागायतदार आणि पोलिसांतर्फे जनजागृती करण्यात येईल.

पोलिस अधीक्षक देशमाने यांनी सांगितले की, याबाबत तीन महिन्यांपासून कार्यवाही सुरू आहे. त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे एक पथक स्थापन केले आहे. फसवणूक प्रकरणी गुन्हे दाखल केले असून आरोपी अटकेत आहे. पोलिस दल यंत्रणेच्या माध्यमातून व्यापाऱ्यांची पडताळणी करून देईल. त्यासाठी शेतकऱ्यांनी माहिती पुरवावी. याबाबत लवकरच बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष श्री. भोसले, श्री. शिंदे यांच्यासह शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या. त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना व्हाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Agriculture Minister manikrao Kokate big announcement for farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.