निवडणुकीनंतर शाळेसाठी शिक्षकांची दमछाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 00:13 IST2019-05-01T00:12:38+5:302019-05-01T00:13:07+5:30
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सोमवारी (दि.२९) मतदान झाल्यानंतर निवडणुकीच्या कामकाजासाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी नाशिक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांची निवडणूक कर्मचारी म्हणून मोठ्या प्रमाणात नेमणूक केली होती

निवडणुकीनंतर शाळेसाठी शिक्षकांची दमछाक
नाशिक : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सोमवारी (दि.२९) मतदान झाल्यानंतर निवडणुकीच्या कामकाजासाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी नाशिक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचीनिवडणूक कर्मचारी म्हणून मोठ्या प्रमाणात नेमणूक केली होती. या सर्व शिक्षकांना मतदानाच्या दुसºया दिवशी शाळेत हजर रहावे लागल्याने जवळपास ४८ तासांच्या अविरत कर्तव्यानंतर शाळेत पोहोचताना त्यांची मोठी दमछाक झाली. शिक्षक संघटनांनी केलेल्या सुट्टीच्या मागणीला शिक्षण विभागाने केराची टोपली दाखविल्याने शिक्षकांची अशी ससेहोलपट झाल्याचा आरोप विविध शिक्षक संघटनांनी केला आहे.
शिक्षकांना आपल्या मुख्यालयाबाहेर निवडणुकीची जबाबदारी सोपवलेली असल्याने पुन्हा आपल्या मुख्यालयी पोहोचण्यासाठी सर्व शिक्षकांना कसरत करावी लागली. काही शिक्षक शाळांमध्ये नियमित वेळेत उपस्थित राहू शकले नाही. परंतु, शिक्षण विभागाने ज्याप्रमाणे शिक्षकांच्या मागणीची दखल घेतली नाही. त्याचप्रमाणे संबंधित सर्व शिक्षक पुन्हा नियमित वेळेत शाळेत दाखल झाले की नाही याविषयी कोणतीही माहिती घेतली नाही. लोकसभा निवडणुकीत सोमवारी (दि.२९) सायंकाळी उशिरा मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुन्हा मंगळवारी सकाळी शाळेत कसे पोहोचणार, असा सवाल उपस्थित करीत शिक्षकांना निवडणुकीच्या दुसºया दिवशी सुटी मिळावी, अशी मागणी नाशिक जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांनी केली होती. मात्र जिल्हा परिषद प्रशासनाने शिक्षकांच्या मागणीला केराची टोपली दाखवत कोणताही प्रतिसाद दिला नव्हता. त्यामुळे जिल्हाभरातील विविध शाळांमधील शिक्षकांना मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर रात्रीचा प्रवास करून आपल्या शाळेत वेळेत पोहोचण्यासाठी धावपळ करावी लागली.
शिक्षकांना अधिकृत सुट्टी नाही
काही शिक्षक दळणवळणाच्या सुविधांअभावी शाळेत नियमित वेळेत पोहचू शकले नाही. अशा शिक्षकांची संख्या जवळपास २० ते २५ टक्के असल्याची माहिती सूत्रांंनी दिली. परंतु, शिक्षण विभागाने शिक्षकांना अधिकृत सुट्टी दिलेली नाही. त्यामुळे याविषयी कोणतीही माहिती घेतली नसल्याचे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांनी सांगितले.