विद्यार्थ्यांच्या स्वागताला आचारसंहितेचा अडसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 01:45 IST2018-06-11T01:45:52+5:302018-06-11T01:45:52+5:30
नाशिक : मुलांमध्ये शाळांविषयी आकर्षण वाढावे यासाठी शाळेच्या पहिल्याच दिवशी नवागतांचे स्वागत करण्यात येत असले तरी यंदा विधान परिषद निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या स्वागताचा मान स्थानिक नगरसेवकांऐवजी प्रभागातील मान्यवर नागरिकांना मिळणार आहे.

विद्यार्थ्यांच्या स्वागताला आचारसंहितेचा अडसर
नाशिक : मुलांमध्ये शाळांविषयी आकर्षण वाढावे यासाठी शाळेच्या पहिल्याच दिवशी नवागतांचे स्वागत करण्यात येत असले तरी यंदा विधान परिषद निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या स्वागताचा मान स्थानिक नगरसेवकांऐवजी प्रभागातील मान्यवर नागरिकांना मिळणार आहे.
येत्या १५ जूनपासून शहरातील सर्व शाळा सुरू होत आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येणार असून, त्याची पूर्वतयारी म्हणून १० जून रोजी महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये शिक्षक रु जू होणार असून १३ जूनपर्यंत सर्व शाळांमध्ये स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे. तसेच शाळांमध्ये पताका, सुविचारांचे फलक आदींच्या माध्यमातून शाळा सजविण्यात येणार आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व शाळांमध्ये प्रभात फेरी काढण्यात येणार आहे. मनपा शाळांमध्ये दरवर्षी विद्यार्थ्यांचे स्वागत त्या प्रभागातील नगरसेवक-लोकप्रतिनिधींच्या हस्ते केले जाते; मात्र यंदा शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सुरू असल्याने लोकप्रतिनिधींना सहभागी होता येणार नाही. त्याऐवजी स्थानिक मान्यवर नागरिकांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प व मिठाई देऊन स्वागत केले जाणार आहे. अनेक शाळांमध्ये बचतगटांकडून विद्यार्थ्यांना गोड भोजन देण्याचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल करून घेण्यासाठी नेहमीप्रमाणे १५ ते ३० जून या कालावधीत शिक्षकांमार्फत शाळा परिसरातील वस्त्यांमध्ये जाऊन दाखलपात्र विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण केले जाईल. मनपाच्या शाळेत पटसंख्या वाढविण्यासाठी पालकांच्या भेटी घेऊन शिक्षणाचे महत्त्व विशद केले जाणार आहे.
मुले वंचित राहणार
सर्वशिक्षा अभियानांतर्गत महापालिकेच्या शाळांमधील ३२ हजार विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके शाळेच्या पहिल्याच दिवशी देण्यात येणार आहेत. राज्य पाठ्यपुस्तक महामंडळामार्फत मनपाला पुस्तके प्राप्त झाली. सर्व शाळांना पुस्तकांचे वितरण करण्यात आले आहे. तथापि, पहिलीच्या पुस्तकांची अद्याप छपाई सुरू असल्याने पहिल्या दिवशीही पुस्तके मिळण्याची शक्यता नाही.