टिपू सुलतानची तसबीर अखेर प्रशासनाने हटवली; गुन्हा दाखल करण्याची हिंदुत्ववाद्यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 06:27 IST2026-02-15T06:23:24+5:302026-02-15T06:27:48+5:30
शिंदेसेनेच्या नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेत सदर तसबीर हटविण्याच्या मागणीसाठी मनपा आयुक्त रवींद्र जाधव यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करत निवेदन दिले होते.

टिपू सुलतानची तसबीर अखेर प्रशासनाने हटवली; गुन्हा दाखल करण्याची हिंदुत्ववाद्यांची मागणी
मालेगाव (नाशिक) : येथील महापालिकेत उपमहापौर व समाजवादी पार्टीच्या नेत्या शान-ए-हिंद यांनी त्यांच्या दालनात पाठीमागे म्हैसूरचा अठराव्या शतकातील शासक टिपू सुलतान यांची तसबीर लावल्याने वाद पेटला. या प्रकरणी शुक्रवारी शिंदेसेनेच्या नगरसेवकांसह हिंदुत्ववादी संघटनांनी त्यास आक्षेप घेतल्यानंतर शनिवारी महापालिका प्रशासनानेच तसबीर हटवली. दरम्यान, उपमहापौर मात्र पुन्हा तसबीर लावण्यावर ठाम असून, हिंदुत्ववादी संघटनांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
शिंदेसेनेच्या नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेत सदर तसबीर हटविण्याच्या मागणीसाठी मनपा आयुक्त रवींद्र जाधव यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करत निवेदन दिले होते.
पुन्हा तसबीर लावण्यावर ठाम
उपमहापौर शान-ए-हिंद यांनी सांगितले, की शनिवारी सुटी असल्याने हा फोटो कार्यालयाच्या दुरुस्तीसाठी काढून ठेवण्यात आला आहे. दुरुस्तीचे काम संपल्यानंतर आमच्या विचारधारांशी जुळणारे तसेच संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार धर्मनिरपेक्ष असलेल्यांचे फोटो लावणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या शौर्यामुळे आणि भारतात स्वराज्याची संकल्पना देऊन प्रसिद्ध आहेत. आणि त्याच पद्धतीने टीपू सुलतान यांनीही इंग्रजांविरुद्ध लढा दिला व त्यांनी वीर अशा योद्ध्याचे रूप दाखवले. त्यामुळे त्यांच्या शौर्याची किंमत पाहता त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांशी समकक्ष मानले जाऊ शकते.
हर्षवर्धन सपकाळ, प्रदेशाध्यक्ष काँग्रेस
छत्रपती शिवाजी महाराज आणि टीपू सुलतान यांची तुलना करणे खूपच चुकीचे व लाजिरवाणे आहे. असे जोडे चाटणे मी या जन्मात बघितले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि सामान्य माणसाला मुक्त केले, तर टीपू सुलतानने अनेक हिंदूंची हत्या केली होती. अशा व्यक्तीला
छत्रपती शिवाजी महाराजांच्या समक्ष म्हणणे दुर्दैवी अत्यंत दुर्दैवी आहे. काँग्रेसला लाज वाटायला हवी सपकाळ यांनी माफी मागावी.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री