घाटावर पाणी अपेक्षितच असल्याचा प्रशासनाचा दावा
By Admin | Updated: April 27, 2015 23:44 IST2015-04-27T23:43:46+5:302015-04-27T23:44:21+5:30
घाटावर पाणी अपेक्षितच असल्याचा प्रशासनाचा दावा

घाटावर पाणी अपेक्षितच असल्याचा प्रशासनाचा दावा
नाशिक : गंगापूर धरणातून हजार क्यूसेक पाण्याचे शेतीसाठी आवर्तन सोडल्यानंतर या पाण्याखाली कुंभमेळ्यासाठी विकसित करण्यात येणारा घाट बुडाल्याने कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या या घाटाच्या उपयोगीतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना, प्रशासनाने मात्र घाट पाण्याखाली बुडाल्यासच त्याचा भाविकांच्या स्नानासाठी उपयोग होणार असल्याचा दावा करून कुंभमेळ्यात या घाटांचा ६० टक्के वापर होणार असल्याचे म्हटले आहे.
प्रारंभी पर्यावरणवाद्यांनी या घाटाच्या कामाला विरोध दर्शविल्यानंतर त्यात लोकप्रतिनिधींनीही उडी घेतली. त्यानंतर कसेबसे काम पूर्ण करण्यात येत असताना शनिवारी गंगापूर धरणातून शेतीसाठी एक हजार क्यूसेक पाणी गोदावरीत सोडण्यात आले. या पाण्याने विस्तारीकरण केलेल्या घाटाच्या चार पायऱ्या पाण्याखाली बुडाल्या. सिंहस्थ कुंभमेळा भर पावसाळ्यात येणार असून, गेल्या कुंभमेळ्याचा अनुभव पाहता, पहिल्या पर्वणीच्या आदल्या दिवशीच गोदावरीला आलेल्या महापुरामुळे साऱ्या तयारीची दाणाफाण उडाली होती. यंदाही तसेच होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एक हजार क्यूसेक पाण्यातच जर घाटाच्या पायऱ्या पाण्याखाली दिसेनाशा होत असतील, तर पावसाळ्यात दुथडी भरून वाहताना घाटाचा स्नानासाठी कितपत उपयोग होईल? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.