अपर जिल्हाधिकारी सक्तीच्या रजेवर?
By Admin | Updated: June 10, 2017 01:02 IST2017-06-10T01:02:10+5:302017-06-10T01:02:48+5:30
नाशिक : मे महिन्यात पर्यटनासाठी सुटीवर गेलेले अपर जिल्हाधिकारी सुटी संपवून रुजू होण्यास आल्यानंतर त्यांना हजर करून घेण्यास शासनाने नकार दिल्याची चर्चा होत आहे.

अपर जिल्हाधिकारी सक्तीच्या रजेवर?
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : मे महिन्यात पर्यटनासाठी सुटीवर गेलेले अपर जिल्हाधिकारी सुटी संपवून रुजू होण्यास आल्यानंतर त्यांना हजर करून घेण्यास शासनाने नकार दिल्याची जोरदार चर्चा होत असून, यामागची कारणमिमांसा स्पष्ट होऊ शकली नसली तरी, निफाडच्या काही नगरसेवकांची अपात्रता व जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या निवडणुकीत घातलेला घोळ ही प्रमुख कारणे विद्यमान राज्यकर्त्यांच्या नाराजीची असल्याची बोलली जातात.
कान्हुराज बगाटे यांनी नाशिकच्या अपर जिल्हाधिकारी पदाची सूत्रे ताब्यात घेतल्यानंतर गौण खनिज चोरी विषयी त्यांची कारवाई संशयास्पद ठरल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांची बदनामी करणारे मोठे होर्डिंग्ज अज्ञात व्यक्तींनी लावले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात प्रशासनाची इभ्रत जाहीर फलकाद्वारे काढण्यात आल्याने फलक लावणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची भाषा महसूल प्रमुखांकडून करण्यात आली, परंतु कालापव्ययात हा विषय मागे पडला. बगाटे यांनी मात्र नेहमीच या साऱ्या गोष्टींचा इन्कार केला. तथापि, मे महिन्याच्या प्रारंभी ते खासगी कामानिमित्त दीर्घ सुटीवर गेले, तीन आठवड्यानंतर त्यांनी पुन्हा रुजू होण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याविरुद्धच्या तक्रारींची दखल घेत विभागीय आयुक्तांनी त्यांना पाचारण करून चांगलाच जाब विचारल्याची चर्चा महसूल विभागात आहे.
नाशिक जिल्हा परिषदेत त्रिशंकू अवस्था असतानाही भारतीय जनता पक्षाने मोठ्या हाराकिरीने विषय समित्या ताब्यात घेतल्या, त्यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणाऱ्या बगाटे यांनी विरोधकांना मदत होईल अशा प्रकारचे निर्णय घेतल्याच्या तक्रारी भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी वरिष्ठांकडे केल्या होत्या. त्यामुळे अगोदरच खप्पामर्जी झालेल्या राज्यकर्त्यांनी अपर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे रजेवर गेल्याची संधी साधून त्यांना पुन्हा त्याच पदावर हजर न करून घेण्याच्या सूचना महसूल प्रमुखांना दिल्याचे सांगण्यात येते व त्यातूनच बगाटे यांना माघारी पाठविण्यात आल्याचे बोलले जात आहे.