Nashik Violence:नाशिकमध्ये अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्यावरुन हिंसक आंदोलनाची घटली. नाशिकच्या द्वारका परिसरात कारवाईला विरोध करणाऱ्या जमावाकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले आहेत. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. त्यानंतर सकाळच्या सुमारास कोर्टाच्या आदेशानुसार अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्यात आले. मात्र यावेळी पोलिसांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आल्याने अनेकजण जखमी झाले.
नाशिकच्या काठे गल्ली भागातील सात पीर बाबा परिसरातील धार्मिक हटवण्यासाठी बुधवारी महानगरपालिका आणि पोलिसांनी तयारी सुरू केली होती. मात्र मोठ्या प्रमाणात आलेल्या जमावाने या कारवाईला विरोध केला. त्यानंतर पोलिसांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी बळाचा वापर करुन जमावाला पांगवले आणि सकाळी धार्मिक स्थळ हटवण्यात आले. महानगरपालिकेने हे धार्मिक स्थळ अनधिकृत प्रार्थनास्थळांच्या यादीत असल्याची नोटीस देऊन ते १५ दिवसांच्या आत हटवण्यास सांगितले होते. मात्र मुदत संपूनही कोणतीही कारवाई झाली नाही. मुंबई उच्च न्यायालयाने धार्मिक स्थळ अनधिकृत ठरवून तो हटवण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे महापालिकेने या धार्मिक स्थळावर कारवाईला सुरूवात केली होती.
महापालिकेने पोलीस प्रशासनासह रात्री कारवाईला सुरुवात केली होती. मात्र मोठ्या प्रमाणात एकत्र आलेल्या जमावाने कारवाईला विरोध करत दगडफेक केली. यामध्ये पोलीस कर्मचारी जखमी झाले. जमावाने दगडफेक करुन काही गाड्यांचे नुकसान देखील केले. त्यानंतर पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करुन परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. याप्रकरणी १५ ते २० जणांना ताब्यात देखील घेण्यात आलं.
"रात्री सात पीर बाबा परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. त्या ठिकाणी अचानक दीड हजाराच्या आसपास लोकांनाच जमाव एकत्र आला. जमावाने पोलिसांवर जीवे ठार मारण्याच्या उद्देषाने दगडफेक केली. त्यामध्ये काही जमाव टेरिसवरुन देखील दगडफेक करत होता. या हल्ल्यात ३० पोलीस अंमलदार आणि अधिकारी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत," अशी माहिती एका जखमी पोलीस कर्मचाऱ्याने दिली.