Accident to a two-wheeler due to animals lying horizontally | जनावरे आडवी आल्याने दुचाकीला अपघात

सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेले जखमी पंडित आहेर.

ठळक मुद्देपोलीस जखमी : दुचाकीवरील नियंत्रण सुटले

सुरगाणा : जनावरे रस्त्यावर आल्याने दुचाकीला अपघात होऊन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेजवळ सुरगाणा-उंबरठाण महामार्गावर बुधवारी (दि.२०) सायंकाळी ४.४५ च्या दरम्यान झाला.

नाशिक येथे कार्यरत पोलीस कर्मचारी पंडित आनंदा आहेर (३७) रा. जामुना, भोरमाळ, ता. सुरगाणा हे दुचाकीवरून घरी परतत असताना उंबरठाण रस्त्यावरील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेजवळ अचानक रस्त्यावर जनावरे आल्याने आहेर यांचा दुचाकीवरील नियंत्रण सुटून तोल जाऊन दुचाकीला अपघात झाला. दुचाकीवरून रस्त्यावर जोरात आदळल्याने पंडित आहेर यांच्या डोक्याला, खाद्यांला तसेच नाकाला गंभीर दुखापत झाली. अर्ध्या तासाहून अधिक वेळ रस्त्यावर ते पडून होते. त्याचवेळी जलपरिषद सदस्य शिक्षक रतन चौधरी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त जखमी पोलिसाला खासगी रुग्णवाहिकेने सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात पोहचविले.

समाज माध्यमांद्वारे पटली ओळख
जखमीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर ही व्यक्ती नेमकी कोण अशी विचारणा वैद्यकीय अधिकारी यांनी शिक्षकाला केल्याने शिक्षक= बुचकळ्यात पडले. अखेर त्यांनी अपघातग्रस्त व्यक्तीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. त्यानंतर तासाभरात त्यांची ओळख पटल्याने जखमी पोलिसाचे आई, वडील व नातेवाईक यांनी सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. दरम्यान पुढील उपचारासाठी पंडित अहेर यांना नाशिक येथे दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Accident to a two-wheeler due to animals lying horizontally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.