आधार कार्ड केंद्र अचानक बंद
By Admin | Updated: August 6, 2015 00:34 IST2015-08-06T00:16:08+5:302015-08-06T00:34:43+5:30
मनपा सिडको विभागीय कार्यालयातील प्रकार

आधार कार्ड केंद्र अचानक बंद
सिडको : महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या आवारात नुकतेच सुरू केलेले आधार कार्ड केंद्र बुधवारी अचानक बंद करण्यात आल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. कोणतीही पूर्वसूचना न देता केंद्र बंद ठेवण्यात आल्याने नगरसेवक अॅड. अरविंद शेळके यांनी सकाळपासूनच आधार कार्ड काढण्यासाठी जमलेल्या शालेय विद्यार्थी व नागरिकांना बरोबर
घेत विभागीय अधिकाऱ्यांची भेट
घेत केंद्र सुरूच ठेवण्याची मागणी केली.
शालेय विद्यार्थ्यांबरोबरच सर्वच क्षेत्रात कामकाज करताना आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. शालेय विद्यार्थ्यांनाही यातून सुटका नसून पालकांना सर्वच शाळेतील व्यवस्थापनाकडूनही विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढण्यासाठी सांगण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनाही चांगलेच काम लागले आहे. अनेक पालक नोकरीला न जाता आधार कार्ड केंद्र सुरू असेल त्या ठिंकाणी जाऊन आपल्या पाल्याचे आधार कार्ड काढून घेत आहे. मनपाच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या आवारात नुकतेच आधार कार्ड केंद्र सुरू करण्यात आले होते. यामुळे याठिकाणी आधार कार्ड काढण्यासाठी सकाळपासून रांगा लागत होत्या.
नेहमीप्रमाणे बुधवारीही सकाळी विद्यार्थी तसेच पालकांनी सकाळपासून गर्दी केली होती. परंतु दहा वाजल्यानंतरही केंद्र सुरू झाले नाही. यामुळे काही नागरिकांनी याबाबत नगरसेवक अॅड. अरविंद शेळके यांना कळविताच त्यांनी मनपा कार्यालयात येऊन नागरिकांना बरोबर घेत मनपा विभागीय अधिकारी आर. आर. गोसावी यांची भेट घेत आधार कार्ड केंद्र सुरूच ठेवण्याचे सांगितले. गोसावी यांनी याबाबत वरिष्ठांशी बोलणी करून आधार कार्ड केंद्र सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले. (वार्ताहर)