सावरकर बदनामी प्रकरणी राहुल गांधी हाजीर हो! नाशिकच्या न्यायालयाचे निर्देश
By संजय पाठक | Updated: March 1, 2025 19:53 IST2025-03-01T19:52:57+5:302025-03-01T19:53:24+5:30
जामीन घेण्यासाठी राहुल गांधी यांनी उपस्थित राहावे अशी मागणी अर्जदारांनी केली. ती मान्य करण्यात आली.

सावरकर बदनामी प्रकरणी राहुल गांधी हाजीर हो! नाशिकच्या न्यायालयाचे निर्देश
संजय पाठक, नाशिक- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी काढलेल्या कथित अनुद्गार प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी न्यायालयात हजर राहून जामीन घ्यावा असे निर्देश आज नाशिकच्या न्यायालयाने दिले आहेत.
राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली होती. यादरम्यान त्यांनी वर्धा येथे बोलताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा माफीवीर असा उल्लेख करून त्यांच्यावर टीका केली होती. त्या संदर्भात भावना दुखावल्याने नाशिकमधील सावरकरप्रेमी देवेंद्र भुतडा यांनी अॅड. मनोज पिंगळे यांच्यामार्फत नाशिकच्या न्यायालयात बदनामी फौजदारी दावा कलम ५००, ५०४ अन्वये दाखल केला आहे. त्यावर आज सुनावणी झाली.
आज राहुल गांधी यांनी उपस्थित राहू शकत नाहीत, असे कारण त्यांचे वकील जयंत जायभावे आणि आकाश छाजेड यांनी दिले. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीचा अर्ज मंजूर करण्यात आला. मात्र जामीन घेण्यासाठी राहुल गांधी यांनी उपस्थित राहावे अशी मागणी अर्जदारांनी केली. ती मान्य करण्यात आली. याच वेळी राहुल गांधी यांनी यांना न्यायालयात कायमस्वरूपी अनुपस्थित राहण्याची आणि प्रसंगी दुरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी असाही अर्ज राहुल गांधी यांच्या वकिलांनी सादर केला आहे. मात्र त्यावर पुढील तारखेला म्हणजे ९ मे रोजी सुनावणी होणार आहे, अशी माहिती अॅड मनोज पिंगळे यांनी दिली.