तेलंगाणाच्या हॉटेलमध्ये रचले नाशिकच्या उच्चशिक्षित महिलेने कर्ज फसवणूकीचे कटकारस्थान, 500लोक पडले बळी

By अझहर शेख | Published: January 9, 2024 05:46 PM2024-01-09T17:46:39+5:302024-01-09T17:47:19+5:30

विना व्याज कर्जाचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश नाशिक आर्थिक गुन्हे शाखेने केला आहे.

A highly educated woman from Nashik hatched a loan fraud conspiracy in a hotel in Telangana | तेलंगाणाच्या हॉटेलमध्ये रचले नाशिकच्या उच्चशिक्षित महिलेने कर्ज फसवणूकीचे कटकारस्थान, 500लोक पडले बळी

तेलंगाणाच्या हॉटेलमध्ये रचले नाशिकच्या उच्चशिक्षित महिलेने कर्ज फसवणूकीचे कटकारस्थान, 500लोक पडले बळी

नाशिक: विना व्याज कर्जाचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश नाशिक आर्थिक गुन्हे शाखेने केला आहे. या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार असलेली उच्चशिक्षित महिला संशयित लावण्या पटेल उर्फ लतिका खालकर हिने तेलंगणामधील काही हॉटेलांमध्ये फरार संशयितांसोबत बसून कट शिजविल्याची माहिती पोलिस तपासात समोर येत आहे. आतापर्यंत न्यायालयाने तीनवेळा पोलिस कोठडीत वाढविली. बुधवारी (दि.१०) पोलिस पुन्हा न्यायालयापुढे लावण्या हिस उभे करणार आहे.

मध्यमवर्गीय व ज्यांचा आर्थिक स्तर खुपच घसरलेला आहे, अशा गरजूंना हेरून त्यांना विना व्याज २ ते ५ लाख रूपयांचे कर्ज देण्याचे आमीष दाखवून त्यांच्याकडून कर्जाचे सुरूवातीचे दोन हप्त्यांची रक्कम व कर्ज प्रक्रियेच्या नावाखाली शुल्क असे सुमारे १० ते १५ हजार रूपये घेऊन सुमारे ४०० लोकांना गंडा घातल्याचा प्रकार पंधरवड्यापुर्वी उघडकीस आला होता. पाथर्डीफाटा परिसरात एस.के फायनान्स सर्व्हिसेस व बालाजी फायनान्स सर्व्हिसेस नावाने कंपन्यांचे कार्यालय सुरू करून लोकांना विना व्याज कर्ज वाटप करण्याचा फसवेगीरीचा प्रकार मागीलवर्षी नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत घडला. नाशिक शहरासह जिल्ह्यातील सुमारे ५०० लोक याला बळी पडले. ५० लाखांपेक्षा जास्त व्याप्ती या घोटाळ्याची असून पोलिसांनी मुख्य संशयित लावण्या पटेलसह पाच एजंटांना बेड्या ठोकल्या आहेत. न्यायालयाच्या आदेशान्वये संशयित मोईजअली सय्यद, नवनाथ खालकर, सुगत औटे, उत्तम जाधव, विनोद जिनवाल उर्फ विकी या पाच संशयितांना मध्यवर्ती कारागृहात पाठविण्यात आले आहे. पटेलची पोलिस कोठडी बुधवारी संपणार असल्याने तिला पुन्हा न्यायालयापुढे उभे केले जाणार आहे.

७ लाखांचे ११ तोळे सोने जप्त
लावण्याच्या चौकशीत पोलिसांनी अनेक बाबींचा उलगडा केला आहे. तिच्या नाशिकमधील सिडको येथील राहत्या घरातून सुमारे ७ लाख रूपयांचे ११ तोळे सोनेदेखील पोलिसांनी जप्त केले आहे. या घोटाळ्यात आणखी काही संशयितांची नावे समोर आली आहे. पोलिस आता त्यांचाही माग काढत आहेत. या दहा ते पंधरा संशयितांचा या घोटाळ्यात काय भूमिका होती, व परराज्यातील संशयितांचा ठावठिकाण्याबाबतची माहिती पोलिसांकडून लावण्याच्या चौकशीत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.

तेलंगणाच्या संशयितांच्या मागावर पोलिस
या संपूर्ण घाेटाळ्याचे पूर्वनियोजन हैद्राबाद व तेलंगाणातील तारांकित हाॅटेलमध्ये झाल्याचे तपासात पुढे येत आहे. एम.एस्सीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या संशयित लावण्या हिने मास्टरमाइन्ड संशयित कृष्णाराव रेड्डी, माधवन कृष्णन, श्रीनिवासन यांच्यासोबत बैठका करत कट शिजविल्याचे पुढे आले आहे. पोलिस आता तेलंगणाच्या दिशेने तपास गतीमान करण्याचा प्रयत्नात आहेत.

Web Title: A highly educated woman from Nashik hatched a loan fraud conspiracy in a hotel in Telangana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.