नाशिक : आठवडाभरापासून उघडीप दिलेल्या पावसाने शनिवारी (दि. ५) अचानकपणे दुपारी दीड वाजेपासून शहरासह उपनगरीय भागामध्ये हजेरी लावली. अचानक ढग दाटून आले आणि सोसाट्याच्या वाऱ्यासोबत जोरदार सरींचे आगमन झाले. क्षणार्धात पावसाचा जोर प्रचंड वाढल्याने एकच तारांबळ उडाली. वादळी वा-यासह मुसळधार पावसाने तासाभरात अवघे शहर जलमय झाले. हंगामात प्रथमच शहरात एका तासात ९.६ मिमी पावसाची नोंद झाल्याचे हवामान निरीक्षण केंद्राकडून सांगितले गेले. संध्याकाळपर्यंत ११.३ मिमी इतका पाऊस झाला.पावसाने विश्रांती घेतल्याने मागील चार दिवसांपासून शहराच्या वातावरणात पूर्णपणे बदल झाला. दिवसा कडक ऊन आणि संध्याकाळनंतर पावसाच्या हलक्या सरींचा वर्षाव, पहाटे धुके असा काहीसा अनुभव नाशिककरांना येत होता. दोन दिवसांपासून शहराच्या कमाल तापमानातसुद्धा अचानकपणे वाढ झाली होती. शुक्रवारी तापमानाचा पारा थेट ३३ अंशांपर्यंत जाऊन भिडला. यामुळे शहरात दमटपणा वाढीस लागून उकाडाही जाणवत होता. दरम्यान, शुक्रवारी रात्री १० वाजेनंतर काही उपनगरांमध्ये पावसाच्या हलक्या सरींचा वर्षावही झाला.
९.६ मीमी पाऊस : तासाभरात नाशिक शहर झाले जलमय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 18:34 IST
जोरदार पावसाचा तासाभराचा ‘स्पेल’ येणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला होता.
९.६ मीमी पाऊस : तासाभरात नाशिक शहर झाले जलमय!
ठळक मुद्दे संध्याकाळपर्यंत ११.३ मिमी इतका पाऊस ...अन् लख्ख सूर्यप्रकाश