९.६ मीमी पाऊस : तासाभरात नाशिक शहर झाले जलमय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 06:30 PM2020-09-05T18:30:50+5:302020-09-05T18:34:35+5:30

जोरदार पावसाचा तासाभराचा ‘स्पेल’ येणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला होता.

9.6 mm rain: Nashik city became waterlogged in an hour! | ९.६ मीमी पाऊस : तासाभरात नाशिक शहर झाले जलमय!

९.६ मीमी पाऊस : तासाभरात नाशिक शहर झाले जलमय!

googlenewsNext
ठळक मुद्दे संध्याकाळपर्यंत ११.३ मिमी इतका पाऊस ...अन् लख्ख सूर्यप्रकाश

नाशिक : आठवडाभरापासून उघडीप दिलेल्या पावसाने शनिवारी (दि. ५) अचानकपणे दुपारी दीड वाजेपासून शहरासह उपनगरीय भागामध्ये हजेरी लावली. अचानक ढग दाटून आले आणि सोसाट्याच्या वाऱ्यासोबत जोरदार सरींचे आगमन झाले. क्षणार्धात पावसाचा जोर प्रचंड वाढल्याने एकच तारांबळ उडाली. वादळी वा-यासह मुसळधार पावसाने तासाभरात अवघे शहर जलमय झाले. हंगामात प्रथमच शहरात एका तासात ९.६ मिमी पावसाची नोंद झाल्याचे हवामान निरीक्षण केंद्राकडून सांगितले गेले. संध्याकाळपर्यंत ११.३ मिमी इतका पाऊस झाला.
पावसाने विश्रांती घेतल्याने मागील चार दिवसांपासून शहराच्या वातावरणात पूर्णपणे बदल झाला. दिवसा कडक ऊन आणि संध्याकाळनंतर पावसाच्या हलक्या सरींचा वर्षाव, पहाटे धुके असा काहीसा अनुभव नाशिककरांना येत होता. दोन दिवसांपासून शहराच्या कमाल तापमानातसुद्धा अचानकपणे वाढ झाली होती. शुक्रवारी तापमानाचा पारा थेट ३३ अंशांपर्यंत जाऊन भिडला. यामुळे शहरात दमटपणा वाढीस लागून उकाडाही जाणवत होता. दरम्यान, शुक्रवारी रात्री १० वाजेनंतर काही उपनगरांमध्ये पावसाच्या हलक्या सरींचा वर्षावही झाला.


शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास हवामान खात्याकडून नाशिक, अहमदनगर येथे पुढील तीन तासात वादळी वाºयासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला होता. दुपारी दीड वाजेपासून शहरासह विविध उपनगरांमध्ये पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला टपोºया थेंबांचा वर्षाव होता होता, क्षणार्धात मुसळधार पाऊस सुरू झाला. शहरातील उंच-सखल भागात तळे साचले. ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी तुंबले होते. शहरातील दूध बाजार, दहीपूल, सरस्वती नाला, राजेबहाद्दर लेन, भद्रकाली आदी भागात पाणी तुंबले होते. सिडको परिसरात आठ ते दहा ठिकाणी वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटनाही घडल्या. महापालिकेच्या भूमिगत गटारी, नाले ओसंडून रस्त्यांवर वाहू लागले होते. सरस्वती नाल्यातील पाणी दहीपुलात ठिंकठिकाणी चेंबरमधून रस्त्यावर वाहू लागल्याने हा परिसर पूर्णत: जलमय बनला होता. सरस्वती नाल्याची स्वच्छता महापालिका प्रशासनाकडून कधी करण्यात येईल, असा प्रश्न या भागातील व्यापऱ्यांसह स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.

...अन् लख्ख सूर्यप्रकाश
दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास शहरात लख्ख सूर्यप्रकाश पडला. यामुळे तासाभरापूर्वी जोरदार पाऊस झाला की नाही, अशी शंकाही नागरिकांना आली. जोरदार पावसाचा तासाभराचा ‘स्पेल’ येणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला होता. यापूर्वी असा मान्सूनपूर्व पाऊस झाला होता. पावसाच्या हंगामात एका तासात दहा मिमीपर्यंत पाऊस झाल्याची आतापर्यंत नोंद पेठरोडवरील हवामान निरीक्षण केंद्राकडे नव्हती.

Web Title: 9.6 mm rain: Nashik city became waterlogged in an hour!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.