सायबर गुन्हेगारी : ...जेव्हा चक्क पोलिसालाच घातला जातो ८० हजारांना ऑनलाइन गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 19:37 IST2021-02-13T19:37:19+5:302021-02-13T19:37:48+5:30
क्रेडिट कार्डची मर्यादा वाढिवण्याबाबत विचारपूस केली. यावेळी कऱ्हे यांनी त्यांना होकार दर्शविला अन् अलगद सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकले.

सायबर गुन्हेगारी : ...जेव्हा चक्क पोलिसालाच घातला जातो ८० हजारांना ऑनलाइन गंडा
नाशिक : एरवी सायबर गुन्हेगारांकडून सर्वसामान्य युवकांची विविध आमिषापोटी ऑनलाइन आर्थिक फसवणुकीचे प्रकार झाल्याचे अनेकदा समोर आले आहे; मात्र बँकेतून बोलत असल्याची बतावणी करून क्रेडिट कार्डाची मर्यादा वाढवून देण्याचे आमिष दाखवून अज्ञात सायबर गुन्हेगाराने चक्क एका पोलिसालाच ८० हजारांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, शहर पोलीस दलात कार्यरत संदीप श्रावण कऱ्हे (रा.स्नेहबंधन पार्क,पोलीस वसाहत) यांच्याकडे आरबीएल बँकेचे क्रेडिट कार्ड आहे. गेल्या २८ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास सायबर गुन्हेगाराने त्यांच्याशी मोबाइलद्वरे संपर्क साधला. सायबर गुन्हेगारांनी कऱ्हे यांच्याशी संवाद साधताना त्यांना बँकेतून बोलत असल्याचे भासविले. त्यांच्या क्रेडिट कार्डची मर्यादा वाढिवण्याबाबत विचारपूस केली. यावेळी कऱ्हे यांनी त्यांना होकार दर्शविला अन् अलगद सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकले. कार्डची गोपनीय माहिती आणि ओटीपी क्रमांक मिळवून सायबर चोरट्यांनी त्यांच्या क्रेडिट कार्डद्वारे एका कंपनीतून सुमारे ७९ हजार १४ रुपयांची खरेदी केली. ही बाब लक्षात येताच कऱ्हे यांना आपली फसवणूक झाल्याची खात्री पटली. त्यांनी तत्काळ सरकारवाडा पोलीस ठाणे गाठले आणि फिर्याद दिली.