मुलाचा वाढदिवस करून घरी परतणाऱ्यांवर काळाचा घाला; नाशिक इथं अपघातात ७ नातेवाईकांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 11:32 IST2025-07-17T11:01:57+5:302025-07-17T11:32:39+5:30
बुधवारी मध्यरात्री अपघात : सर्व मृत दिंडोरी तालुक्यातील रहिवासी

मुलाचा वाढदिवस करून घरी परतणाऱ्यांवर काळाचा घाला; नाशिक इथं अपघातात ७ नातेवाईकांचा मृत्यू
भगवान गायकवाड
दिंडोरी (नाशिक) : दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीत कृषी उत्पन्न बाजार समिती समोर बुधवारी (दि. १६) मध्यरात्री वणी-नाशिक रोडवर अल्टो कार ( क्र. एम एच ०४ डी वाय ६६४२) ) आणि एका मोटर सायकलचा अपघात होऊन अल्टो कार रस्त्याच्या बाजूला पाणी असलेल्या नालीमध्ये उलटली. यामध्ये कार मधील सात जणांचा मृत्यू झाला आहे.
मोटर सायकल वरील मंगेश यशवंत कुरघडे (वय-२५ ) अजय जगन्नाथ गोंद (वय -१ ) रा. नडगे गोट, तालुका जव्हार, जिल्हा पालघर सध्या राहणार पिंपळगाव सातपूर हे जखमी असून त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. मृतांमध्ये देविदास पंडित गांगुर्डे, (वय २८) रा. सारसाळे ता. दिंडोरी, जिल्हा -नाशिक, मनीषा देविदास गांगुर्डे (वय२३), रा. सारसाळे ता. दिंडोरी, जिल्हा. नाशिक, उत्तम एकनाथ जाधव (वय ४२) रा. कोशिंबे, ता दिंडोरी, जिल्हा नाशिक, अलका उत्तम जाधव,( वय ३८ ) रा. कोशिंबे ता. दिंडोरी जिल्हा. नाशिक, दत्तात्रेय नामदेव वाघमारे, (वय ४५) रा. देवपूर, देवठाण ता. दिंडोरी, जिल्हा नाशिक, अनुसया दत्तात्रय वाघमारे, (वय ४०) रा देवपूर, देवठाण ता. दिंडोरी, जिल्हा नाशिक आणि भावेश देविदास गांगुर्डे,( वय २) रा. सारसाळे, ता दिंडोरी, जिल्हा नाशिक यांचा समावेश आहे.
अल्टो कारमधील व्यक्ती हे त्यांचे नातेवाईकाचे मुलाचे वाढदिवसाच्या कार्यक्रमाकरिता नाशिक येथे गेलेले होते. ते परतीच्या प्रवासात असताना सदरचा अपघात झालेला आहे. अपघातानंतर अल्टो कार रस्त्याचे बाजूचे पाणी असलेल्या नालीमध्ये पलटी झाल्याने व आतील व्यक्तींना बाहेर निघता न आल्याने त्यांचे नाका तोंडात पाणी जाऊन बुडून मृत्यू पावल्याचे प्रथमदर्शनी दिसत असून याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक शेगर करीत आहेत.