११ महिन्यांत १८८ विनयभंग, ५२ बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 00:38 IST2019-12-19T00:37:38+5:302019-12-19T00:38:39+5:30
‘महिला हिंसाचाराला माझा नकार’ असा जागर केला जात असला तरी शहरात महिला हिंसाचाराच्या घटनांना आळा बसू शकलेला नाही. मागील काही महिन्यांपासून ‘निर्भया’ पथक शहराच्या रस्त्यांवर गस्त घालत आहे.

११ महिन्यांत १८८ विनयभंग, ५२ बलात्कार
नाशिक : ‘महिला हिंसाचाराला माझा नकार’ असा जागर केला जात असला तरी शहरात महिला हिंसाचाराच्या घटनांना आळा बसू शकलेला नाही. मागील काही महिन्यांपासून ‘निर्भया’ पथक शहराच्या रस्त्यांवर गस्त घालत आहे. यामुळे काही टवाळखोर, रोडरोमियोंना चाप बसला असला तरी ११ महिन्यांत विनयभंगाच्या तब्बल १८८ आणि बलात्काराच्या ५२ घटना पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घडल्या आहेत. यावरून शहरात महिला अत्याचाराचे स्वरूप सहज लक्षात येते.
कुंभनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक पुण्यनगरीत महिला अत्याचाराचे पाप दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. पोलीस आयुक्तालयांनी महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी ‘निर्भया’ पथकासह विविध उपक्रम हाती घेतले आहे.
शहरातील महिलांची वर्दळ असलेल्या ‘हॉट स्पॉट’ची निवड करून त्या ठिकाणांवर साध्या वेशात अन् वाहनात महिला, पुरुष पोलिसांचे पथक ‘वॉच’ ठेवून आहे. या निर्भया पथकाकडून गर्दीच्या ठिकाणी टवाळ्या करणाºया टवाळखोरांवर कारवाईदेखील होत आहे; मात्र महिलांचे विनयभंग व बलात्काराच्या घटनांची आकडेवारी बघता मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी काही प्रमाणात अत्याचारात वाढ झाल्याचे दिसून येते.
विनयभंग, बलात्कारासारख्या घटनांमध्ये बहुतांशवेळा संशयित आरोपी हे पीडितेच्या
ओळखीचे असल्याचे तपासात पुढे आले आहे.
१७५ गुन्ह्यांची उकल
यावर्षी घडलेल्या विनयभंगाच्या १८८ गुन्ह्यांपैकी १७५ गुन्ह्यांमधील संशयितांची ओळख पटविण्यास पोलिसांना यश आले आहे. गेल्या वर्षी १६९ गुन्ह्यांमधील संशयितांचा शोध पोलिसांनी घेतला होता. मागील वर्षी व चालू वर्षी नोव्हेंबरअखेरपर्यंत शहरात ५२ बलात्काराच्या घटना घडल्या, तर या पंधरवड्यात दोन अल्पवयीन मुलींसोबत बलात्कार झाल्याची नोंद झाली. मागील ५२ गुन्ह्यांमधील संशयित अद्याप निष्पन्न होऊ शकलेले नाही.