महापालिकेच्या ४३ सेवा आता मोबाइल अॅपवर मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 00:53 IST2018-09-08T00:12:03+5:302018-09-08T00:53:09+5:30
विविध प्रकारचे दाखले आणि परवानग्या मिळविण्यासाठी शासकीय स्तरावरील धावपळ टाळण्यासाठी महापालिकेने आता विविध प्रकारच्या तब्बल ४३ सेवा आॅनलाइन केल्या असून, या सेवेचा शुभारंभदेखील करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांची धावपळ आता टळणार असून, घरबसल्या डिजिटल स्वाक्षरीनिशी दाखले मिळणार आहेत.

महापालिकेच्या ४३ सेवा आता मोबाइल अॅपवर मिळणार
नाशिक : विविध प्रकारचे दाखले आणि परवानग्या मिळविण्यासाठी शासकीय स्तरावरील धावपळ टाळण्यासाठी महापालिकेने आता विविध प्रकारच्या तब्बल ४३ सेवा आॅनलाइन केल्या असून, या सेवेचा शुभारंभदेखील करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांची धावपळ आता टळणार असून, घरबसल्या डिजिटल स्वाक्षरीनिशी दाखले मिळणार आहेत. इतकेच नव्हे तर घरगुती अशाप्रकारच्या परवानग्या मिळतातानाच त्या मोबाईल अॅपवर तर मिळतीलच शिवाय भविष्यात व्हॉटस अॅपवरदेखील देण्याचे नियोजन आहे.
महापालिकेच्या मुख्यालयासह विभागीय कार्यालये आणि उपकेंद्र अशा २२ ठिकाणी नागरी सेवा केंद्रे असून, अशा विविध ठिकाणी नागरिकांना होणारी पायपीट थांबणार आहे. राज्य शासनाच्या ई-गव्हर्नन्स धोरणानुसार महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यासंदर्भात पुढाकार घेऊन आयटी विभागाला आदेश दिले होते. त्यानुसार आता सर्व सेवांसाठी असलेल्या नियम अटी आणि कागदपत्रांचे सुसूत्रीकरण करण्यात आले असून, परिणामकारक सेवा देण्यात येणार आहे.
नव्या पद्धतीने वेगाने कामकाज करण्यासाठी तीन टप्पे व तीन कागदपत्रे कमी झाली असून, वेबसाइटबरोबरच मोबाइल अॅपवर दाखले आणि परवानग्या मिळणार आहेत.
महापालिकेने त्यासाठी परिश्रमपूर्वक बिझनेस प्रोसेस रिइंजिनिअरिंग अंतर्गत सर्व विभागातील अंशत: वेगवेगळी असणारी प्रक्रिया एकसारखी केली असून आता कोणत्याही परवानगीसाठी ठराविकच कागदपत्रांची मागणी होईल. यामुळे नागरीकांचा त्रास वाचणार आहे. एकूणच प्रक्रियेमध्ये सुलभता आणल्याने परवानगी अथवा दाखले देण्याची प्रक्रिया वेगाने होणार
आहे.
व्हॉट्सअॅपवर मिळणार दाखले
महापालिकेने भविष्यात व्हॉट्सअॅपवरही दाखले देण्याची तयारी केली आहे. अर्जदाराच्या मोबाइल नंबरवर व्हॉट्सअॅप असल्यास दाखल्याची प्रत किंवा परवानगी पत्र मेलवर तसेच व्हॉट्सअॅपवर पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.