200 एस.टी. कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागितली स्वेच्छा मरणाची परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 15:40 IST2021-12-28T15:30:01+5:302021-12-28T15:40:37+5:30
नाशिक - एस.टी.चे राज्य शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी गेल्या ६३ दिवसांपासून संपावर असलेल्या पंचवटी आगारातील सुमारे २०० कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे ...

200 एस.टी. कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागितली स्वेच्छा मरणाची परवानगी
नाशिक - एस.टी.चे राज्य शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी गेल्या ६३ दिवसांपासून संपावर असलेल्या पंचवटी आगारातील सुमारे २०० कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे इच्छा मरणाची परवानगी मागितली आहे. या संदर्भातील निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून, न्याय मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नैराश्य आल्यानेच ते आत्महत्या करीत आहे. त्यापेक्षा सर्वांनाच इच्छा मरणाची परवानगी मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून राज्यभरात एस.टी. कर्मचारी संपावर आहेत. नाशिकमधील सर्वच्या सर्व १३ डेपोंमधील कर्मचाऱ्यांनीदेखील संपात सक्रिय सहभाग घेतला आहे. काही कर्मचारी कामावर परतले असले तरी ९८ टक्के कर्मचारी संपावर आहेत. विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना त्यामध्ये काहीतरी सकारात्मक निर्णय होईल असे वाटत असताना आता बडतर्फीची कारवाई सुरू झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. इतर शासकीय कर्मचाऱ्यांपेक्षा एस.टी. कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असतानाही शासनाकडून सकारात्मक भूमिका घेतली जात नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नैराश्य आल्याचे निवेदनात म्हटले आहे.
कर्मचाऱ्यांना न्याय मिळणार नसेल आणि एकेक एस.टी. कर्मचारी बांधव आत्महत्या करीत असल्याने कर्मचाऱ्यांना असुरक्षित वाटू लागल्याने त्यांना इच्छा मरणाची परवानगी मिळावी असे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर देण्यात आलेले आहे. निवेदना पत्रावर २०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी स्वाक्षरी केली आहे.