दोनशे कोटींच्या धनादेशावर तोडगा?
By Admin | Updated: June 10, 2017 01:04 IST2017-06-10T01:04:48+5:302017-06-10T01:04:57+5:30
शुक्रवारी (दि. ९) जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल उदय सांगळे यांनी तातडीची बैठक घेत मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांना सूचना केल्या.

दोनशे कोटींच्या धनादेशावर तोडगा?
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्हा परिषदेच्या लेखा विभागाने दिलेले जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे दोनशे कोटींचे धनादेश वटत नसल्याच्या प्रकरणी शुक्रवारी (दि. ९) जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल उदय सांगळे यांनी तातडीची बैठक घेत मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांना सूचना केल्या. याप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी (दि.१२) पुन्हा जिल्हा परिषद अध्यक्ष कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवारी (दि. ९) दुपारी एक वाजता जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल उदय सांगळे यांनी त्यांच्या कक्षात याप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी एका बैठकीचे आयोजन केले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, सहायक लेखा अधिकारी पी. डी. जाधव तसेच सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेचे आर. टी. शिंदे, विनायक माळेकर, चंद्रशेखर डांगे, मजूर सहकारी संस्था संचालक शशिकांत आव्हाड, सुरेश पांगारकर, सर्जेराव उगले आदी उपस्थित होते. गुरूवारी (८) जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोेरात सभागृहात सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटना व जिल्हा मजूर सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होऊन यावर तोडगा न निघाल्यास सोमवारपासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याची दखल घेत अध्यक्ष शीतल सांगळे यांनी त्यांच्या कक्षात बैठक घेऊन प्रशासनाला तत्काळ तोडगा काढण्याची सूचना केली. त्यावर याबाबत मार्गदर्शन मागविण्यासाठी मुख्य लेखा अधिकारी बोधिग्रहण सोनकांबळे मुंबईला गेल्याचे दीपककुमार मीना यांनी सांगितले.