हिना पांचाळसह २० संशयित स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:17 IST2021-07-07T04:17:51+5:302021-07-07T04:17:51+5:30

नाशिक : इगतपुरीत गेल्या महिन्यात पोलिसांनी हाणून पाडलेल्या रेव्ह पार्टीत सहभागी असलेल्या अभिनेत्री हिना पांचाळसह २० संशयितांचा जामीन इगतपुरी ...

20 suspects including Hina Panchal in the custody of local crime branch | हिना पांचाळसह २० संशयित स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

हिना पांचाळसह २० संशयित स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

नाशिक : इगतपुरीत गेल्या महिन्यात पोलिसांनी हाणून पाडलेल्या रेव्ह पार्टीत सहभागी असलेल्या अभिनेत्री हिना पांचाळसह २० संशयितांचा जामीन इगतपुरी न्यायालयाने सोमवारी (दि.५) फेटाळून लावत त्यांना चौकशीसाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात दिले आहे. या सर्वांना मंगळवारी (दि.६) पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान, न्यायालयाने तिघा संशयितांना जामीन मंजूर केला असून, दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

मागील महिन्यात २६ जूनच्या मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास नाशिक पोलिसांनी इगतपुरीतील स्काय ताज व्हिला या बंगल्यावर छापा टाकत रेव्ह पार्टी उधळून लावली होती. यावेळी अभिनेत्री हिना पांचाळसह एक परदेशी महिला, मराठी आणि दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातील अभिनेत्री, दोन महिला कोरिओग्राफर यांच्यासह २५ जणांना अटक केली होती. दि. ३० जून रोजी या संशयितांना न्यायालयाने ५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. सोमवारी पांचालसह २५ संशयितांना पुन्हा पोलीस निरीक्षक समाधान नागरे व पथकाने इगतपुरी न्यायालयात हजर केले असता न्या. पी. पी. गिरी यांनी संशयितांचा जामीन फेटाळून लावत त्यांना एक दिवसासाठी चाैकशीकरिता स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले. तर सुशांत सावंत, संदीप भोसले व राकेश कानगे यांना जामीन मंजूर केला असून, राजू भगरे व भगवान माळी यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यावेळी सरकारी वकील मिलिंद निर्लेकर यांनी युक्तिवाद करताना सदर सर्व संशयितांनी अमली व मादक पदार्थ जवळ बाळगून सेवन केल्याने व त्याच्या वापराबाबत अधिक तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्याची मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने हिना पांचाळसह २० संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात दिले.

इन्फो

दोन्ही बंगले केले सील

मुंबई-आग्रा महामार्गावरील इगतपुरीतील स्काय ताज व स्काय लगून या आलिशान बंगल्यात सदर रेव्ह पार्टी उधळून लावण्यात आली होती. या रेव्ह पार्टीसाठी वापरण्यात आलेले हे दोन्ही बंगले पोलीस निरीक्षक समाधान नागरे, सर्कल अधिकारी सुरेंद्र पालवे, पोलीस हवालदार मुकेश महिरे यांनी सोमवारी (दि.५) सायंकाळी सील केले. दरम्यान, हिना पांचाळसह अन्य संशयितांना इगतपुरी न्यायालयात हजर करण्यात आले त्यावेळी बघ्यांची न्यायालय आवारात गर्दी झाली होती.

फोटो- ०५ रेव्ह पार्टी-२

इगतपुरीतील रेव्ही पार्टीतील बंगला सील करताना पोलीस निरीक्षक समाधान नागरे, सर्कल सुरेंद्र पालवे, मुकेश महिरे आदी.

Web Title: 20 suspects including Hina Panchal in the custody of local crime branch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.