2 mobiles of two lakhs seized | दोन लाखांचे १३ मोबाइल हस्तगत
दोन लाखांचे १३ मोबाइल हस्तगत

नाशिक : दुचाकीस्वार, पादचाऱ्यांचा मोबाइल हिसकावून पळ करणाºया अल्पवयीन चोरट्यांच्या टोळीचा गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने छडा लावला. या टोळीमधील संशयित चोरटा अतीश विजय शहा (१९, रा. रामवाडी) यास अटक केली आहे. तसेच त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून २ लाख ४७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अतीश शहा हा त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने दुचाकीवरून वेगवेगळ्या परिसरात भटकंती करत बोलत जाणाºया किंवा पादचाऱ्यांच्या हातातील मोबाइल हिसकावून पळ काढत होते. या त्रिकुटाने एप्रिलमध्ये गंगापूर, पंचवटी आणि उपनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून तीन मोबाइल हिसकावून नेल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. १४ हजार, १५ हजार रुपयांचे मोबाइल हिसकावून नेले होते. तसेच या त्रिकुटाने डीजीपीनगर ते आंबेडकरनगर सिग्नल दरम्यान सलीम कय्युम शेख (४९, रा. डीजीपीनगर १) यांच्याकडील मोबाइल हिसकावून पोबारा केल्याचेही निष्पन्न झाले आहे. या तीनही जबरी चोरीच्या घटनांबाबत मंगळवारी (दि.२०) संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच २५ जून रोजी रात्रीच्या सुमारास एक्सलो पॉइंटजवळ तुषार सुधाकर खिल्लारी (२८, रा. अंबड) यांच्याकडील १५ हजार रुपयांचा मोबाइल हिसकावून नेला होता. या प्रकरणी पोलिसांनी तपास करून तिघा संशयितांना ताब्यात घेतले. त्यावेळी या तिघांनी मोबाइल हिसकावल्याचे अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून विविध गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, हिसकावून नेलेले १३ महागडे अ‍ॅन्ड्रॉइड मोबाइल जप्त केले आहेत. पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, सहायक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, सचिन खैरनार, उपनिरीक्षक बलराम पालकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
पोलिसांच्या नाकाबंदीतून सुटका ?
दोघा अल्पवयीन चोरट्यांसह हे त्रिकूट एकाच दुचाकीवरून शहरभर फिरत मोबाइल चोरीचे गुन्हे करत होते. दरम्यान, विना हेल्मेट तसेच क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवून दुचाकीवरून मिरवत असताना शहरातील विविध भागांमध्ये राबविल्या जाणाºया नाकाबंदीतून हे चोरटे कसे सुटले? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. ज्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत या त्रिकुटांच्या टोळीने गुन्हे केले त्या भागात पोलिसांची सातत्याने महत्त्वाच्या सर्वच नाक्यांवर संशयास्पद वाहनांची तपासणी केली जात असतानादेखील हे तिघे कसे सुटले.

Web Title:  2 mobiles of two lakhs seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.