जलसंधारणाच्या कामांना १५ कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 00:42 IST2021-01-27T23:22:27+5:302021-01-28T00:42:26+5:30
येवला : अवर्षणप्रवण असलेल्या तालुक्याच्या उत्तर पूर्व भागाला मोठ्या प्रमाणात जलसंधारणाच्या कामांची गरज असल्याने या भागात २० नव्या बंधाऱ्यांना मान्यता देताना नऊ बंधाऱ्यांच्या दुरुस्तीला राज्य शासनाने परवानगी दिली असून सुमारे १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

जलसंधारणाच्या कामांना १५ कोटींचा निधी
येवला : अवर्षणप्रवण असलेल्या तालुक्याच्या उत्तर पूर्व भागाला मोठ्या प्रमाणात जलसंधारणाच्या कामांची गरज असल्याने या भागात २० नव्या बंधाऱ्यांना मान्यता देताना नऊ बंधाऱ्यांच्या दुरुस्तीला राज्य शासनाने परवानगी दिली असून सुमारे १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
सदर भाग पूर्णतः अवर्षणप्रवण असून या भागात पडलेले पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहून जाते. परिणामी, डिसेंबरनंतर येथे टंचाई जाणवते. त्यामुळे छोटे-मोठे पाझर तलाव, बंधारे, सिमेंट बांध होणे गरजेचे असल्याची मागणी ग्रामस्थांकडून होत होती. त्यानुसार, राज्याचे मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी राजापूर येथे ८ सिमेंट काँक्रिट बंधाऱ्याच्या कामांना मंजुरी दिली आहे.
याशिवाय ममदापूर येथे पाच, रहाडी येथे २, खरवडी येथे २ व सोमठाणजोश येथे ३ अशा एकूण २० सिमेंट काँक्रिटीकरण बंधाऱ्याच्या कामांना सुमारे १२ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर केला आहे.
याशिवाय भारम येथे सिमेंट काँक्रिटचा बांध व साठवण तलाव, रहाडी येथे दोन गावतळे, नगरसुल येथे साठवण बांध व गावतळे, डोंगरगाव येथे साठवण तलाव तर ममदापूर व पाटोदा येथे साठवण तलावाच्या दुरुस्तीला सुमारे अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिला आहे. या कामांना लवकरच तांत्रिक मान्यता मिळून प्रारंभ केला जाणार आहे.