उत्तर महाराष्ट्रात १३३ लाचखोरांच्या हाती पडल्या बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 17:53 IST2020-12-29T17:48:00+5:302020-12-29T17:53:19+5:30
लोकसेवकांनी भ्रष्टाचाराकडे वळत लाचेची मागणी करत सर्वसामान्यांची अडवणूक केल्याचे दिसुन आले. सर्वाधिक गुन्हे लॉकडाऊन शिथिलतेनंतर घडल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

उत्तर महाराष्ट्रात १३३ लाचखोरांच्या हाती पडल्या बेड्या
नाशिक : सरकारी कार्यालयांमध्ये सर्वसामान्यांची विविध कामांसाठी अडवणूक करत लोकसेवकांकडून सर्रासपणे लाच मागण्याचे प्रमाण अद्यापही कमी झालेले दिसून येत नाही. उत्तर महाराष्ट्रात या वर्षभरात तब्बल १३३ लाचखोर लोकसेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकले. सर्वाधिक ३२ सापळे अहमदनगर जिल्ह्यात तर त्यापाठोपाठ नाशिकमध्ये २७ सापळे विभागाने यशस्वीरित्या रचले गेले.
यावर्षी मार्च महिन्यापासूनच कोविड-१९ अर्थात कोरोनाचा प्रादूर्भाव सुरु झाल्याने शासकीय कामकाजही मोठ्या प्रमाणात प्रभावीत झाले होते. शासकिय कार्यालयांमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्याही रोडावली होती, तरीदेखील या वर्षभरात नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदूरबार, जळगाव अशा पाच जिल्ह्यांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक परिक्षेत्रात एकुण १०० लोकसेवक रंगेहाथ लाच घेताना पकडले गेले. यामध्ये सर्वाधिक पोलीस आणि महसुल खात्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. नाशिकमध्ये वर्षभरात नऊ लाचखोर पोलीसांसह महसुल खात्याच्या सात कर्मचाऱ्यांविरुध्द कारवाई करण्यात आली आहे. तसेच अहमदनगरमध्येसुध्दा आठ पोलीस आणि नऊ महसुल कर्मचारी लाचेची रक्कम घेताना सापळ्यात अडकले. नाशिक परिक्षेत्रात एकुण २६ लाचखोर महसुल कर्मचारी आणि २४ पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नाशिक परिक्षेत्रात चालु वर्षभरात शंभर सापळे यशस्वी ठरले तर अपसंपदेप्रकरणी चार गुन्हे दाखल करण्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला यश आले. या विभागात एकुण १०४ गुन्हे यावर्षी दाखल झाले. लॉकडाऊन शिथिल होताच शासकिय कार्यालयांमधील कामकाजाची गाडी रुळावर आली आणि काही लोकसेवकांनी भ्रष्टाचाराकडे वळत लाचेची मागणी करत सर्वसामान्यांची अडवणूक केल्याचे दिसुन आले. सर्वाधिक गुन्हे लॉकडाऊन शिथिलतेनंतर घडल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. नाशिक परिक्षेत्रात दाखल झालेल्या १०४गुन्हयांपैकी ४८ गुन्ह्यांचा तपास प्रलंबित आहे तर १२ गुन्ह्यांत विभागाने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहेत.
---
यावर्षी कोरोनामुळे करण्यात आलेला लॉकडाऊनचा परिणाम भ्रष्टाचाराच्या तक्रारींवर झालेला दिसतो. तरीही शंभर सापळे यशस्वी झाले. यावर्षी नाशिक युनीटने कृषी खात्यातील वर्ग-१, प्रदूषण मंडळातील वर्ग-१व२, गृह खात्याशी संबंधित वर्ग-१च्या अधिकाऱ्यांना लाचेची रक्कम घेताना रंगेहाथ पकडले. कोविड-१९चे आव्हान पेलत विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी पार पाडली. परिक्षेत्रातील एकुण १६ अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधाही झाली होती. राज्यात नाशिकचा भ्रष्टाचारविरोधी कारवाईत दुसरा क्रमांक लागतो.
-सुनील कडासने, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक