नाशिक : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) २०२० पर्यंत बंद पडणार असल्याची खोटी माहिती एचएएलकडे कुठल्याही प्रकल्पाचे काम शिल्लक नसल्याच्या आधारावर पसरविली जात आहे; मात्र एचएएलमध्ये लवकरच हलक्या लढाऊ ‘तेजस’ नावाचे १२३ विमानांची निर्मिती सुरू होणार असल्याचा विश्वास संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला.शहरात अग्र प्रेरणा अधिवेशनाच्या उद्घाटनानिमित्त भामरे रविवारी (दि.१८) आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले. एचएएलकडे काम शिल्लक नाही, अशी चुकीची माहिती पसरविली जात आहे. एचएएल बंद पडणार नाही, याची खात्री बाळगावी. कारण एचएएलच्या नाशिकसह देशातील सर्वच प्लान्टमध्ये येणाऱ्या काळात १२३ ‘तेजस’ विमानांच्या निर्मितीच्या कार्याला वेग येणार आहे. तब्बल १ लाख कोटी रुपयांचा हा प्रकल्प एचएएलला देण्यात आल्याची माहिती भामरे यांनी यावेळी दिली. ते म्हणाले, त्यामुळे २०२० नंतरही एचएएलमध्ये कामे सुरूच राहणार आहे.
एचएएल बनविणार १२३ ‘तेजस’ लढाऊ विमाने : सुभाष भामरे
By अझहर शेख | Updated: November 18, 2018 19:00 IST