१२१० जणांना लाभले म्हाडाचे घर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 00:59 IST2019-05-30T00:59:16+5:302019-05-30T00:59:30+5:30
नाशिक मंडळातील म्हाडाच्या घरांसाठी काढण्यात आलेल्या सोडतीत १२१० जणांना म्हाडाच्या घराची लॉटरी लागली असून, शहरातील पाच विविध ठिकाणी तसेच धुळे आणि श्रीरामपूर येथे असलेल्या म्हाडाच्या घरांसाठी नाशिक मंडळातून १६१९ अर्ज प्राप्त झाले होते.

१२१० जणांना लाभले म्हाडाचे घर
नाशिक : नाशिक मंडळातील म्हाडाच्या घरांसाठी काढण्यात आलेल्या सोडतीत १२१० जणांना म्हाडाच्या घराची लॉटरी लागली असून, शहरातील पाच विविध ठिकाणी तसेच धुळे आणि श्रीरामपूर येथे असलेल्या म्हाडाच्या घरांसाठी नाशिक मंडळातून १६१९ अर्ज प्राप्त झाले होते. या अर्जांची सोडत काढण्यात आल्यानंतर अनेकांच्या घरांचे स्वप्न या माध्यमातून पूर्ण झाले आहे. विविध उत्पन्न गटातून काढण्यात आलेल्या सोडतीमधून १२१० लाभार्थी आता स्वत:च्या घरात प्रवेश करणार आहेत.
नाशिक मंडळातील आडगाव, मखमलाबाद, म्हसरूळ, पाथर्डी आणि पंचक तसेच धुळे व श्रीरामपूर येथील घरांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. आलेल्या सुमारे अडीच हजार अर्जाची सोडत दादासाहेब गायकवाड सभागृहात काढण्यात आली. यातून १२१० भाग्यवंतांना म्हाडाचे घर लाभले आहे.
महाराष्टÑ गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे अध्यक्ष उदय सामंत यांच्या हस्ते या सोडतीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी १२१० सदनिकांची संगणकीय आॅनलाइन सोडत काढण्यात आली. म्हाडाच्या घरांसाठी २६१९ अर्ज प्राप्त झाले होते.यातून अत्यल्प उत्पन्न गट असणाऱ्यांसाठी १९३, अल्प उत्पन्न गटातून ४८६ तर मध्यम उत्पन्न गट असणाऱ्यांसाठी ५३१ याप्रकारे घरांची लॉटरी काढण्यात आली.
सोडतीनंतर घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता फक्त महत्त्वाची कागदपत्रे म्हणजे पंधर वर्षांचे रहिवासी प्रमाणपत्र, मागासवर्गीय गटातून घर प्राप्त करण्यासाठी जात वैधता प्रमापणपत्र तसेच उत्पन्नाचा दाखला ही कागदपत्रे सादर सादर करावी लागणार आहेत.