११५ विना हेल्मेट दुचाकीस्वारांना ‘दणका’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 00:55 IST2019-08-28T00:54:48+5:302019-08-28T00:55:45+5:30
विना हेल्मेट शहरातील रस्त्यांवर दुचाकी चालविणाऱ्या वाहनचालकांवर शहर वाहतूक पोलीस व संबंधित पोलीस ठाण्यांच्या कर्मचाऱ्यांनी नाकाबंदी करत कारवाई केली. दिवसभरात ११५ वाहनचालकांकडून तब्बल ५७ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

११५ विना हेल्मेट दुचाकीस्वारांना ‘दणका’
नाशिक : विना हेल्मेट शहरातील रस्त्यांवर दुचाकी चालविणाऱ्या वाहनचालकांवर शहर वाहतूक पोलीस व संबंधित पोलीस ठाण्यांच्या कर्मचाऱ्यांनी नाकाबंदी करत कारवाई केली. दिवसभरात ११५ वाहनचालकांकडून तब्बल ५७ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
शहर वाहतूक नियंत्रण शाखा व विविध पोलीस ठाण्यांमधील पोलिसांनी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या आदेशान्वये मंगळवारी (दि.२७) रस्त्यावर उतरून कारवाईचा बडगा उगारला. शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी, जेणेकरून रस्ते अपघातात होणारे मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. यासाठी पुन्हा एकदा जे दुचाकीस्वार हेल्मेटचा वापर करताना दिसून आले नाही, त्यांच्याकडून दंड वसूल केला गेला. यावेळी वाहतूक नियमांचे पालन गरजेचे असल्याबाबत प्रबोधनही करण्यात आले. शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या उपआयुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांच्या नेतृत्वाखाली हेल्मेटसक्तीची मोहीम राबविली जात आहे. आयुक्तालय हद्दीत सहायक पोलीस आयुक्त मंगलसिंह सूर्यवंशी यांनी या मोहिमेवर नियंत्रण ठेवले. सर्व पोलीस ठाणेनिहाय नाक्यांवर हेल्मेट न वापरणाºया दुचाकीस्वारांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. सकाळी नऊ वाजेपासून आयुक्तालय हद्दीत कारवाईला सुरुवात करण्यात आली होती. येत्या शनिवार (दि.३१) पर्यंत मोहीम सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.
हेल्मेटचा वापर, सीटबेल्ट लावणे, झेब्रा क्रॉसिंगचे पालन, सिग्नलपालनासह आदी वाहतूक नियमांचे पालनाबाबत जागृती केली जात आहे. तसेच दुचाकीवर जाताना मोबाइलचा सर्रास वापर, एका दुचाकीवर दोनपेक्षा अधिक व्यक्तींचा प्रवास, मद्यप्राशन करून वाहन चालविणाºयांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात येत आहे.
पोलीस आयुक्तांच्या वतीने तीन महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर हेल्मेट तपासणी मोहीम राबविण्यात आली आहे. मात्र शहरात सुरु असलेल्या रस्त्याच्या कामांमुळे सदर मोहीम मुख्य रस्त्यांवर न राबविता गंगापूररोड तसेच मुंबई नाका या ठिकाणी प्राधान्याने राबविण्यात आली.
दरम्यान, सदर मोहीम सुरु करण्यापूर्वी आयुक्तालयाने यासंदर्भातील माहिती सोशल मिडीयाच्या माध्यमातून नाशिककरांसाठी जाहीर केली होती. अचानक मोहीम न राबविता वाहनधारकांना संधी मिळावी यासाठी वाहनधारकांना सूचित करण्यात आले होते. सकाळी सुरु झालेली ही मोहीम दुपारनंतर मात्र थंडावली. या मोहीमेत शंभरपेक्षा अधिक वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येऊन त्यांना समज देण्यात आली. सदर मोहीम सुरुच राहणार आहे.
रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण
वर्ष गंभीर अपघात किरकोळ अपघात मयत एकूण अपघात
(जाने. ते जुलै)
२०१८ - १७९ ४१ १२३ ३४७
२०१९- १६८ ५२ ९८ ३१६
मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी शहरात रस्ते अपघात कमी झाल्याचा पोलीस प्रशासनाचा दावा आहे. अपघातासोबत अपघाती मृत्यूच्या संख्येतदेखील घट झाल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघातांमध्ये ३१ने तर अपघातात जागीच मृत्यूच्या प्रमाणात २७ ने घट झाली आहे. विशेषत: हेल्मेटचा वापर वाढल्याने अपघाती मृत्यूच्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येते.