Nashik Crime: शिक्षकांनी पालकांकडे तक्रार केल्यावर घरी ओरडा मिळेल किंवा मार पडेल, या भीतीने लहान मुलं काय करू शकतात, याच एक धक्कादायक उदाहरण नाशिकमध्ये समोर आले आहे. जेलरोड परिसरातील एका ११ वर्षीय मुलाने चक्क स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचला. इतकेच नाही, तर एखाद्या थरारपटात शोभेल अशी कथाही पोलिसांना सांगितली. मात्र, पोलिसांनी तांत्रिक तपास करताच या चिमुकल्याचा फिल्मी बनाव उघड झाला.
नेमकं प्रकरण काय?
मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास जेलरोडवरील नारायण बापू नगर परिसरात राहणारा हा ११ वर्षांचा विद्यार्थी नगरसेवक शैलेश ढगे यांच्याकडे आला. तो प्रचंड घाबरलेला होता. त्याने सांगितलेली हकीकत ऐकून ढगे यांच्यासह उपस्थितांच्या पायाखालची जमीनच सरकली. "मी मित्राकडे अभ्यासाचं गाईड आणण्यासाठी पिंटो कॉलनीकडे गेलो होतो. तिथून परतत असताना रिक्षामधून तीन लोक आले. त्यांनी मला जबरदस्तीने पकडून एका गोणीत कोंडले. त्यानंतर त्यांनी मला अज्ञात स्थळी नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, रिक्षा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ थांबली असताना, मी माझ्या कंपासमधील कर्कटकाने पोतं फाडलं आणि तिथून जीवाच्या आकांताने पळ काढला," असं त्या विद्यार्थ्याने सांगितले.
सीसीटीव्हीने पोलखोल केली
अपहरणासारख्या गंभीर घटनेची माहिती मिळताच नगरसेवक ढगे यांनी तत्काळ पोलिसांना कळवले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी युद्धपातळीवर तपास सुरू केला. पोलिसांनी तातडीने पिंटो कॉलनी ते शिवाजी पुतळ्यापर्यंतचा मार्ग पिंजून काढला. या मार्गावरील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले, मात्र पोलिसांना कुठेही संशयास्पद रिक्षा किंवा विद्यार्थ्याने सांगितलेली घटना आढळली नाही.
दोन तासांच्या चौकशीत सत्य बाहेर
पोलिसांना तपासात कोणतेही पुरावे न मिळाल्याने त्यांचा संशय बळावला. त्यानंतर पोलिसांनी विद्यार्थ्याला विश्वासात घेऊन प्रेमाने सखोल चौकशी केली. सुमारे दोन तासांच्या चौकशीनंतर या चिमुकल्याने रडत रडत सत्य सांगितले. शाळेत काही कारणास्तव शिक्षकांनी पालकांकडे तक्रार केली होती. घरी गेल्यावर पालक रागावतील आणि मारतील, या प्रचंड भीतीने त्याने घरातून बाहेर पडून हा अपहरणाचा बनाव रचल्याची कबुली दिली.
पालक आणि पोलिसांची मोठी धावपळ
या घटनेमुळे पोलीस प्रशासन आणि पालकांची मोठी धावपळ झाली. अखेर सत्य समोर आल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. पोलिसांनी पालकांना समज देऊन मुलाला त्यांच्या स्वाधीन केले.
Web Summary : A Nashik boy, fearing parental scolding after a teacher's complaint, staged his own kidnapping. His elaborate story fell apart when CCTV footage contradicted his claims, revealing the truth after police investigation. Parents and police were relieved.
Web Summary : नाशिक में एक छात्र ने शिक्षक की शिकायत के बाद माता-पिता से डांट के डर से अपने अपहरण का नाटक किया। सीसीटीवी फुटेज से उसकी कहानी झूठी साबित हुई। पुलिस जांच में सच्चाई सामने आई, जिससे माता-पिता और पुलिस ने राहत की सांस ली।