३४२ कोटी अडकले; ‘येस’ बॅँकेला ‘नो’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 00:37 IST2020-03-07T00:35:54+5:302020-03-07T00:37:20+5:30
आर्थिक अडचणींमुळे निर्बंध घालण्यात आलेल्या येस बॅँकेत नाशिक महापालिकेचे किमान ७० कोटी रुपये अडकले असून, त्यामुळे ऐन मार्चअखेर ही स्वायत्त संस्था अडचणीत आली आहे. नियमित खर्चाबरोबरच ठेकेदारांची देयके देण्यातदेखील अडचणी निर्माण झाल्या आहेत. दरम्यान, गुरुवारी (दि.५) रात्रीच आयुक्तांनी दिलेल्या सूचनेनुसार शुक्रवारी (दि.६) दिवसभरातील सर्व भरणा येस बॅँकेत भरणे बंद करून तो एसबीआयमध्ये जमा करण्यात आला.

३४२ कोटी अडकले; ‘येस’ बॅँकेला ‘नो’
नाशिक : आर्थिक अडचणींमुळे निर्बंध घालण्यात आलेल्या येस बॅँकेत नाशिक महापालिकेचे किमान ७० कोटी रुपये अडकले असून, त्यामुळे ऐन मार्चअखेर ही स्वायत्त संस्था अडचणीत आली आहे. नियमित खर्चाबरोबरच ठेकेदारांची देयके देण्यातदेखील अडचणी निर्माण झाल्या आहेत. दरम्यान, गुरुवारी (दि.५) रात्रीच आयुक्तांनी दिलेल्या सूचनेनुसार शुक्रवारी (दि.६) दिवसभरातील सर्व भरणा येस बॅँकेत भरणे बंद करून तो एसबीआयमध्ये जमा करण्यात आला. याशिवाय स्मार्ट सिटी कंपनीचे सुमारे साडे चारशे कोटी रुपये या बॅँकेत अडकले होते परंतु कंपनीने टप्प्याटप्प्याने ही रक्कम काढून घेतल्याने कंपनीचे १४ कोटी रुपयेच अडकले आहेत. तर शिक्षण विभागाचे १५ कोटी असे एकूण शंभर कोटी रुपये अडकले आहेत.
येस बॅँकेची आर्थिक स्थिती खालावली असून, ती आणखी बिघडू नये यासाठी रिझर्व्ह बॅँकेने गुरुवारी (दि.५) या बॅँकेवर आर्थिक निर्बंध घातले आहेत. त्यानुसार कोणत्याही खातेदाराला आता केवळ ५० हजार रुपयेच काढता येतील. त्यामुळे नाशिकमधील हजारो खातेदारांची रक्कम त्यात अडकली आहे. परंतु त्याचबरोबर नाशिक महापालिकेचे किमान ७० कोटी रुपये अडकल्याचे प्राथमिक अंदाज असल्याचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले. या बॅँकेत महापालिकेची नक्की किती रक्कम अडकली आहे, याचा शोध घेतला जात असून, सायंकाळपर्यंत ते स्पष्ट होईल.
पाच वर्षांपूर्वी महापालिकेने आपले बहुतांश व्यवहार या बॅँकेकडे वर्ग केले असून त्यांच्या माध्यमातून सहा ठिकाणी सीएफसी (कॉमन फॅसीलीटी सेंटर) चालवले जाते. त्यात जन्ममृत्यू दाखल्याच्या शुल्कापासून घरपट्टी पाणीपट्टी आकारणीपर्यंत सर्व प्रकारची रक्कम जमा केली जाते. आयुक्त गमे यांनीच दिलेल्या माहितीनुसार महापालिकेचे २२ प्रकारचे खाते या बॅँकेत असून त्यात सर्व प्रकारची रक्कम भरली जाते. परंतु रिझर्व्ह बॅँकेने निर्बंध घातल्यापासून या बॅँकेतील सर्व प्रकारचा भरणा रात्रीपासूनच बंद करण्यात आला असून वेबसाइटवरून आॅनलाइन भरणा येस बॅँकेत होऊ नये यासाठी ती डिसेबल करण्यात आल्याची माहिती आयुक्त गमे यांनी दिली.