नंदुरबारात आपसातील वादातून युवकाचा खून; तीन जण ताब्यात
By मनोज शेलार | Updated: November 13, 2023 18:06 IST2023-11-13T18:05:44+5:302023-11-13T18:06:26+5:30
नंदुरबारातील अमृत चौक भागातील धक्कादायक घटना घडली आहे.

नंदुरबारात आपसातील वादातून युवकाचा खून; तीन जण ताब्यात
नंदुरबार : युवकांच्या आपसातील वादातून एकावर धारदार शस्त्राने वार केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना नंदुरबारात रविवारी मध्यरात्रीनंतर घडली. याबाबत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, इतरांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
योगेश चौधरी (३४) रा. भाट गल्ली, नंदुरबार असे मृत युवकाचे नाव आहे. पोलिस सूत्रांनुसार, नंदुरबारातील अमृत चौक भागात रविवारी मध्यरात्रीनंतर काही युवकांमध्ये वाद झाला. वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. योगेश चौधरी याच्यावर कमरेखाली धारदार शस्त्राने वार करण्यात आले. त्यात तो गंभीर जखमी झाला. अतिरक्तस्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. पहाटे ही घटना समजल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.
घटनास्थळी सकाळी पोलिस अधिक्षक पी. आर. पाटील, अपर अधीक्षक नीलेश तांबे, उपविभागीय अधिकारी संजय महाजन, एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार खेडकर, शहर पोलिस निरीक्षक निवृत्ती पवार यांनी भेट दिली. सायंकाळी उशिरापर्यंत नंदुरबार शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.