दांडिया व गरबांविना यंदा सुनासुना राहणार नवरात्रोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 12:39 IST2020-10-17T12:39:15+5:302020-10-17T12:39:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा नवरात्रोत्सव साजरा होत आहे. सार्वजनीक गरबा, दांडिया यांना यंदा फाटा देण्यात ...

दांडिया व गरबांविना यंदा सुनासुना राहणार नवरात्रोत्सव
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा नवरात्रोत्सव साजरा होत आहे. सार्वजनीक गरबा, दांडिया यांना यंदा फाटा देण्यात येत आहे. नंदुरबारातील खोडाईमाता यात्रोत्सव रद्द करण्यात आला आहे. मंदीरात दर्शनासाठी विविध नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे.
नवरात्रोत्सवात नऊ दिवस मातेचा जागर आणि गरबा-दांडिया यांची रेलचेल असते. यासाठी विविध मंडळे चौकाचौकात दांडियाचे आयोजन करीत असतात. त्यासाठी तरुण, तरुणींमध्ये विशेष उत्साह असतो. यंदा मात्र कोरोनामुळे सर्वांच्याच उत्सहावर पाणी फेरले आहे. गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सव देखील साधेपणाने व गर्दी होणार नाही याची दक्षता घेऊन साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यात सार्वजिनक दुर्गोत्सवाची संख्या अगदीच कमी असते. केवळ रात्री चौकात गरबा, दांडिया खेळला जात असतो. घरगुती स्वरूपात देखील मूर्तीची प्रतिष्ठापणा केली जाण्याचे प्रमाण कमीच आहे. त्यामुळे नंदुरबारात मूर्ती बनविणारे देखील एक, दोनच कारागिर आहेत. त्यांच्याकडील मूर्तींना देखील यंदा अपेक्षीत मागणी राहिली नसल्याचे चित्र होते. नंदुरबारातील खोडाईमाता, वाघेश्वरी देवी तसेच शहाद्यातील अंबाजी, सप्तशृंगी मंदीर या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी होते. नंदुरबारात यात्राही भरते. यंदा या यात्रोत्सव रद्द करण्यात आल्या आहेत. मंदीर परिसरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी होऊ नये यासाठी अडथळे उभारले आहेत. विक्रेत्यांना मंदीर परिसरापासून दूर अंतरावर जागा देण्यात आली आहे. सार्वजनीक गरबा, दांडिया मंडळांतर्फे यंदा रक्तदान, गरजूंना वस्तू वाटप असे उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात सार्वजनिक मंडळांची संख्या कमी असल्यामुळे उपक्रम देखील कमी राहणार असल्याचे चित्र आहे. नवरात्रोत्सव काळात फुलमाळा, पुजेचे साहित्य यासह गरबा, दांडियासाठी लागणारे विविध ड्रेस यांच्यातून मोठी उलाढाल होते. यंदा हा सर्व व्यवसाय ठप्प राहणार आहे. त्यामुळे व्यावसायिकांना फटका बसला आहे. दांडियाची विक्री देखील ठप्प झाली आहे. नंदुरबारातील खोडाईमाता यात्रोत्सवात दरवर्षी लाखो रुपयांची उलाढाल होते. त्यातून अनेकांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होतो. स्थानिक व्यापारी व बाहेरून आलेल्या व्यापाऱ्यांचा त्यात समावेश असतो. यंदा ही सर्व उलाढाल ठप्प झाली असल्याचे चित्र आहे.