डोंगरदरीत भाजीपाला गोळा करण्यासाठी गेलेल्या महिलेचा रस्त्यावर दरड कोसळल्याने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 13:09 IST2021-09-08T12:14:17+5:302021-09-08T13:09:19+5:30
घटनेत मयत झालेल्या महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी वाहन न मिळाल्याने तिच्या पतीने खांद्यावर टाकून मार्गक्रमण सुरू केल्याचे ह्रदयद्रावक चित्र यावेळी समोर आले.

डोंगरदरीत भाजीपाला गोळा करण्यासाठी गेलेल्या महिलेचा रस्त्यावर दरड कोसळल्याने मृत्यू
नंदुरबार: नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागाला जोडणाऱ्या धडगाव ते तळोदा रस्त्यावर दरड कोसळून महिला ठार झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. घटनेत मयत झालेल्या महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी वाहन न मिळाल्याने तिच्या पतीने खांद्यावर टाकून मार्गक्रमण सुरू केल्याचे ह्रदयद्रावक चित्र यावेळी समोर आले.
सुमडीबाई आदल्या पाडवी (55) असे मयत महिलेचे नाव आहे. सुमदबाई व त्यांचे पती आदल्या पाडवी हे चांदसैली ता.धडगाव येथील रहिवासी आहेत. सकाळी डोंगरदरीत भाजीपाला गोळा करण्यासाठी जात असताना हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. अपघातामुळे धडगाव ते तळोदा ही वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी स्थानिक माजी जिल्हा परिषद सदस्य योगेश पाटील यांनी जेसीबी मागवून दरड बाजूला केली. घटनेनंतर तालुका प्रशासन किंवा जिल्हा प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाला नव्हता.