निविदा कमी दराच्या भरल्यावर कामेही कमी दर्जाचीच होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 12:22 IST2020-11-07T12:22:39+5:302020-11-07T12:22:46+5:30
n लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कमी दराने निवीदा भरून कामांचा दर्जा टिकवला जात नाही, अर्ध्यातून कामे सोडून ठेकेदार ...

निविदा कमी दराच्या भरल्यावर कामेही कमी दर्जाचीच होणार
n लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कमी दराने निवीदा भरून कामांचा दर्जा टिकवला जात नाही, अर्ध्यातून कामे सोडून ठेकेदार निघून जातात. केवळ बिलं काढण्यापुरते त्यांची कामे राहतात. त्यामुळे तब्बल २० ते २५ टक्के कमी दराच्या निविदा भरण्यामागचे गौडबंगाल काय? याबाबत जिल्हा परिषद बांधकाम विभाग दखल का घेत नाही असा संतप्त सवाल जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत सदस्यांनी उपस्थित केला. अशा कामांवर त्या त्या भागातील सदस्यांनी लक्ष ठेवावे जेणेकरून कामाचा दर्जा टिकून राहील अशी अपेक्षा अध्यक्षा सिमा वळवी यांनी व्यक्त केली.
जिल्हा परिषद स्थायी समितीची ॲानलाईन सभा अध्यक्षा सिमा वळवी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेला उपाध्यक्ष राम रघुवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, सभापती अभजित पाटील, रतन पाडवी, निर्मला राऊत यांच्यासह सदस्य सी.के.पाडवी, धनराज पाटील, देवमन पवार, मधुकर नाईक यांच्यासह त्या त्या विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत कमी दराच्या निविदा भरण्याच्या प्रकाराबाबत चर्चा झाली. जिल्हा परिषदेच्या विविध कामांच्या निविदा भरतांना त्या २० ते २५ टक्के कमी दराने भरल्या जातात. त्यात मंजुरही होतात. एवढ्या कमी दराने निविदा भरून त्यात काम करणे ठेकेदारांना कसे परवडते. याचा अर्थ कामाचा दर्जा चांगला राहतो काय? ठेकेदार अर्ध्यातून काम सोडून पळून जातात. केवळ बिलं काढण्यापुरते ते मर्यादीत राहतात ही बाब धनराज पाटील, अभिजीत पाटील यांनी समोर आणली. त्यावर बोलतांना अध्यक्षा सिमा वळवी यांनी अशा कामांवर सदस्यांनी लक्ष ठेवावे, ठेकेदारास चांगल्या दर्जाची कामे करण्यास प्रवृत्त करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. उपाध्यक्ष तथा बांधकाम समिती सभापती राम रघुवंशी यांनीही कामांवर लक्ष ठेवले जाईल. पुर्ण कामाशिवाय बिलं काढले जाणार नाही याची दक्षता बांधकाम विभागाने घ्यावी अशा सुचना दिल्या.
ग्रामपंचायत विभाजनास मंजुरी
धडगाव तालुक्यातील गेंदा ग्रामपंचायतींचे विभाजन करून त्यातून तीन वेगळ्या ग्रामपंचायती तयार कराव्या असा प्रस्ताव बैठकीत ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ यांनी सादर केला. त्याला मंजुरी देण्यात आली. गेंदा ग्रामपंचायतीमधून माळ, खुटवडा, शेलदा या तीन नवीन ग्रामपंचायती निर्माण झाल्या आहेत. आता हा ठराव विभागीय आयुक्तांकडे जाईल त्यानंतर विभाजनाचे नोटीफिकेशन निघेल.
बैठकीत आरोग्य, शिक्षण, रोहयोसह इतर विविध विषयांवर देखील चर्चा करण्यात आली.