जिल्ह्यातील ९२ गावांना यंदा पाणीटंचाईची झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:59 AM2021-03-04T04:59:42+5:302021-03-04T04:59:42+5:30

सातपुड्याच्या दुर्गम भागातील धडगाव आणि अक्कलकुंवा या दोन तालुक्यांतील सर्वाधिक गावे आणि पाड्यांचा या टंचाई आराखड्यात समावेश असून, तेथील ...

Water shortage in 92 villages in the district this year | जिल्ह्यातील ९२ गावांना यंदा पाणीटंचाईची झळ

जिल्ह्यातील ९२ गावांना यंदा पाणीटंचाईची झळ

Next

सातपुड्याच्या दुर्गम भागातील धडगाव आणि अक्कलकुंवा या दोन तालुक्यांतील सर्वाधिक गावे आणि पाड्यांचा या टंचाई आराखड्यात समावेश असून, तेथील ग्रामस्थांच्या मागणीनुसार टंचाई आराखड्यानुसार उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्ह्याची भूजल पातळी यंदा दीड मीटरपेक्षा अधिक असली तरीही सातपुड्याच्या दुर्गम भागातील धडगाव तालुक्यात दोन पाड्यांवर यंदाही टँकर लागणार आहे. येत्या काही दिवसांत येथे टँकर सुरू करण्याच्या हालचालींना गती देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, टंचाई निवारण आराखड्यात पाणीपुरवठा योजनांना मंजुरी देण्यासाठी ग्रामपंचायतींना सूचित करण्यात आले आहे. पंचायतींकडून जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव देण्यात आल्यानंतर येथे पाणीपुरवठा योजना मंजुरी किंवा दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. दुसरीकडे पाणीपुरवठा योजनांसोबत जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांमध्ये विंधन विहिरींचे पुन्हा खोदकाम करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या विंधन विहिरींचे खोदकाम अद्याप सुरू झालेले नसले तरी टंचाईग्रस्त गावांमध्ये या विहिरी खोदल्या जातील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. अक्कलकुंवा तालुक्यातील काही पाड्यांवर स्थिती भीषण होणार आहे.

पाणीटंचाईसाठी आराखडा तयार

जिल्हा प्रशासनाकडून डिसेंबर महिन्यापासून चार टप्प्यांचा टंचाई निवारण आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यात ९२ गावे व १८८ पाडे टंचाईग्रस्त असल्याने याठिकाणी उपाययोजना सुरू करण्यात येणार आहेत. यातील अनेक गावांमध्ये सध्या कामही सुरू झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे.

दोन पाड्यांवर टँकर

धडगाव तालुक्यातील कुंडलचा गुगलमालपाडा आणि गाैऱ्याचा बोदलापाडा या दोन पाड्यांना यंदाही टँकर दिले जाणार आहे. या पाड्यांवर १० वर्षांपासून टँकरने पाणीपुरवठा होत आहे.

पाच तालुके टँकरमुक्त; पण...

जिल्ह्यातील धडगाव तालुका वगळता तळोदा, शहादा, अक्कलकुंवा, नंदुरबार आणि नवापूर हे पाच तालुके टँकरमुक्त आहेत; परंतु मे ते जुलै या काळात पावसाने योग्य वेळी हजेरी न दिल्यास अक्कलंकुवा आणि नंदुरबार तालुक्यांतील गावांमध्ये येत्या काळात टंचाई निर्माण होणार आहे.

विहिरींचे अधिग्रहण

जिल्ह्यातील विविध भागांत टंचाईग्रस्त गावांमध्ये यंदा पर्यायी व्यवस्था म्हणून ३८ खाजगी विहिरींचे अधिग्रहण करण्याचे प्रस्ताव आहेत. यातील १० पेक्षा अधिक प्रस्ताव हे नंदुरबार, तर उर्वरित प्रस्ताव हे शहादा व अक्कलकुंवा तालुक्यातील असल्याची माहिती देण्यात आली आहे. या विहिरीतून त्या-त्या गावांमध्ये पाणीपुरवठा होणार आहे.

Web Title: Water shortage in 92 villages in the district this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.