धूळ व खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:33 AM2021-01-19T04:33:44+5:302021-01-19T04:33:44+5:30

कोळदा ते खेतिया या महामार्गावर काही ठिकाणी संथ गतीने कामे सुरू आहेत. कोरीट फाटा ते तापी नदीवरील पूल, ...

Vehicle owners suffer due to dust and potholes | धूळ व खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त

धूळ व खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त

Next

कोळदा ते खेतिया या महामार्गावर काही ठिकाणी संथ गतीने कामे सुरू आहेत. कोरीट फाटा ते तापी नदीवरील पूल, पूल ते तळोदा चौफुली, प्रकाशा-शहादा रस्त्यावर कोकणी माता मंदिर ते गोमाई नदीवरील पुलापर्यंत खड्डे आहेत. रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने प्रचंड प्रमाणात उडणाऱ्या धुळीमुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. अवजड वाहन गेल्यास दुचाकीधारकाला रस्त्यावरील काहीच दिसत नसल्याने अपघातही वाढले आहेत. केळी-पपईसह उसाची वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना कसरत करीत वाहने चालवावी लागतात. ही परिस्थिती गेल्या दोन वर्षापासून आहे. प्रकाशा येथील शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांनी रस्ता कामाबाबत निवेदन दिल्यानंतर ठेकेदार व संबंधित अधिकारी येतात व आश्वासन देतात. रस्त्याची दुरुस्ती करु, कच्च्या रस्त्यावर पाणी मारु, असे आश्वासन देतात. मात्र येथून गेल्यानंतर ही सर्व आश्वासने हवेत विरतात व ‘जैसे थे’ स्थिती होते. आता या समस्येकडे जिल्हाधिकाऱ्यांनीच लक्ष घालून उपाययोजना करण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया त्रस्त वाहनधारक व नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.

गोमाई नदीवरील पूल धोकेदायक

डामरखेडा गावाजवळ गोमाई नदीवर असलेला पूल शेवटची घटका मोजत असल्याची स्थिती आहे. या पुलाचे संरक्षक कठडे तुटले असून लोखंडी सळ्या बाहेर निघाल्या आहेत. पुलावर रस्त्याचे अस्तित्वच नाही. अवजड वाहन पुलावरुन गेल्यास पूल झुल्यासारखा हलतो. केव्हाही याठिकाणी मोठी दुर्घटना घडू शकते, अशी स्थिती आहे. हा रस्ता रस्ते विकास महामंडळ यांच्याकडे आहे. जोपर्यंत नवीन पूल बांधला जात नाही तोपर्यंत या पुलाची डागडुजी करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Vehicle owners suffer due to dust and potholes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.