तळोदा पंचायत समितीच्या आढावा बैठकीत विविध विषयांवर झाली चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 13:02 IST2020-10-16T13:02:33+5:302020-10-16T13:02:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : तळोदा तालुक्यातील घरकुल लाभार्थींना पंचायत समिती च्या चकरा मारू देऊ नका त्यांचा घरकुलचा हप्ता ...

तळोदा पंचायत समितीच्या आढावा बैठकीत विविध विषयांवर झाली चर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : तळोदा तालुक्यातील घरकुल लाभार्थींना पंचायत समिती च्या चकरा मारू देऊ नका त्यांचा घरकुलचा हप्ता तात्काळ खात्यामध्ये जमा करण्यात यावा अशा सूचना पंचायत समिती सभापती यशवंत ठाकरे यांनी तळोदा येथे झालेल्या पंचायत समितीच्या आढावा बैठीकित दिल्या. गुरुवारी ही बैठक घेण्यात आली.
तळोदा पंचायत समितींतर्गत येणार्या सर्व विभागाची ही आढावा बैठक पंचायत समितीच्या सभागृहात झाली. यावेळी पंचायत समिती सभापती यशवंत ठाकरे,उपसभापती हेमलता वळवी, गटविकास अधिकारी सावित्री खर्डे, पंचायत समिती सदस्य दाज्या पावरा, सुमन वळवी, विजय राणा, सुमन वळवी, चंदनकुमार पवार, सोनी पाडवी, विस्तार अधिकारी संजय पाटील, कार्यालयीन अधीक्षक अरविंद अहिरे, गट शिक्षणाधिकारी शेखर धनगर उपस्थित होते. यावेळी बाल विकास प्रकल्प, आरोग्य, शिक्षण, कृषी, बांधकाम, ग्रामीण पाणी पुरवठा, पशुसंवर्धन, लेखा विभाग आणि परिवहन विभागांचा आढावा घेण्यात आला. केंद्र व राज्य शासनाचा धोरणानुसारच शाळा सुरु होतील अशी माहिती गट शिक्षणाधिकारी शेखर धनगर यांनी दिली. पाणी टंचाई वर मात करण्यासाठी देवटेंबा, नयामाळ, रावलापाणी, अक्राणीपाडा, टाकळी आदी ठिकाणी जल जीवन मिशनअंतर्गत काम सुरु करण्यात आल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा वतीने देण्यात आली. खर्डी व मालदा मुक्कामी तसेच हातोडा मार्गे नंदुरबार, नळगव्हान, रांझनी, बन, खरवड आदी ठिकाणी बस चालू करण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली. पंचायत समितीच्या सदस्या सुमन वळवी यांनी सतोना येथील अंगणवाडीची दुरवस्था झाल्याने अंगणवाडीची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी केली. सोनी पाडवी यांनी खेड्यांमध्ये डासांचा पादुर्भाव वाढला असल्याने ग्रामपंचायत मार्फत औषध फवारणी करण्यात यावी अशी मागणी केली. पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक असल्याचे मत विजय राणा यांनी यावेळी व्यक्त केले.
पंचायत समिती मार्फत यावर्षी घेण्यात आलेल्या एकाही बैठकीला आदिवासी विकास विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, मेवासी वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी अथवा प्रतिनिधी हजर राहिलेले नाहीत. त्यामुळे या चारही विभागांना तातडीने पत्र देवून योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी सदस्य दाज्या पावरा यांनी बैठकीत केली.