Three out of four aspiring candidates are novices | vidhan Sabha 2019: चार पैकी तीन इच्छूक उमेदवार नवखे
vidhan Sabha 2019: चार पैकी तीन इच्छूक उमेदवार नवखे

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शिवसेनेतर्फे चार इच्छुकांनी मुलाखती दिल्या असून त्यापैकी तीनजण नवखे आहेत. अक्कलकुवा मतदारसंघासाठी इच्छूक आमशा पाडवी यांनी गेल्या निवडणुकीत देखील सेनेतर्फेच उमेदवारी केली होती. दरम्यान, युतीचा निर्णय होतो किंवा नाही यावर शिवसेनेतील इनकमींग अवलंबून राहणार असून इच्छुकांची संख्या आणखी वाढणार असल्याचे चित्र आहे. 
विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेतर्फे नंदुरबार जिल्ह्यातील चारही मतदारसंघातून इच्छुकांच्या मुलाखती दोन दिवसांपूर्वी घेण्यात आल्या. यात नंदुरबार मतदारसंघासाठी मालती वळवी, शहादा मतदारसंघासाठी रिना पाडवी, अक्कलकुवा मतदारसंघासाठी जिल्हाप्रमुख आमशा पाडवी यांनी तर नवापूर मतदारसंघासाठी रमेश गोबजी गावीत यांनी मुलाखती दिल्या. 
नंदुरबार, शहादा आणि नवापूर मतदारसंघासाठी इच्छुक असलेले तिन्ही पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. तर अक्कलकुवा मतदार संघातील इच्छुक तथा जिल्हा प्रमुख आमशा पाडवी यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत सेनेतर्फे निवडणूक लढविली होती. यंदा पुन्हा ते इच्छूक आहेत.
दरम्यान, भाजप-सेना युती होते किंवा नाही यावरही बरेच काही अवलंबून राहणार आहे. प्राथमिक तयारी म्हणून शिवसेनेने चारही मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. युती झाली नाही तर शिवसेनेत देखील काही प्रमाणात इनकमींग राहणार आहे. त्यामुळे इच्छुकांची संख्या वाढणार आहे. परिणामी ऐनवेळी काही बदल होऊ शकतात अशी शक्यताही शिवसेनेच्या पदाधिका:यांनी व्यक्त केली. 
गेल्या निवडणुकीत युती झाली नव्हती. शहादा मतदारसंघात उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ऐनवेळी राजेंद्रकुमार गावीत यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी केली होती. परिणामी सुरेश नाईक यांना शिवसेनेतर्फे उमेदवारी देण्यात आली होती. नंदुरबारातून विरेंद्र वळवी, नवापूरातून ज्योत्सना नाईक व अक्कलकुवातून आमशा पाडवी उमेदवार होते. 
 

Web Title: Three out of four aspiring candidates are novices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.