उमेदवारांना मत मागण्याची अशी घाई मतदारांच्या मागे शेताकडे निघाले पायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 12:18 IST2021-01-12T12:18:45+5:302021-01-12T12:18:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींमधील ४४९ उमेदवारांचा निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आहे. गेल्या दोन दिवसांत ग्रामदैवतांच्या ...

In such a hurry to ask for votes for the candidates, they went to the fields behind the voters | उमेदवारांना मत मागण्याची अशी घाई मतदारांच्या मागे शेताकडे निघाले पायी

उमेदवारांना मत मागण्याची अशी घाई मतदारांच्या मागे शेताकडे निघाले पायी

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींमधील ४४९ उमेदवारांचा निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आहे. गेल्या दोन दिवसांत ग्रामदैवतांच्या मंदिरात पूजन, महापुरुषांना अभिवादन करून कार्यकर्त्यांसमवेत गावागावांत जोरदार शक्तिप्रदर्शन सुरू आहे. यात काहींनी शेतशिवारही सोडले नसून एकही मतदार सुटायला नको म्हणून शेतात काम करणाऱ्या मजूर मतदारांच्या कामांच्या वेळेत जाऊन भेटी घेतल्या जात आहेत. 
तालुक्यात २७ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम सुरू झाला होता. यातील सहा ग्रामपंचायती बिनविरोध होऊन २१ ग्रामपंचायतींमध्ये प्रत्यक्ष मतदान होणार आहे. तत्पूर्वी गावोगावी प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. यातून गावागावांत ईर्ष्यचे व टोकाचे राजकारण पाहायला मिळत आहे. तो त्याचा, हा याचा ह्याच गप्पा पारावर रंगत आहे. त्यातून एकमेकांचे उणे-दुणेही निघत आहे. प्रत्येक मत महत्त्वाचे मानत पॅनेलप्रमुख व उमेदवार मतदारांची मनधरणी करीत आहे. आर्थिक तंगी तरीही. २०२० वर्षे हे विविध संकटांचे गेले, अनेकांचे होत्याचे नव्हते केले. शेतकरीही अस्मानी संकटाने पुरता हताश झाला. रब्बीवर आशा होती; परंतु अचानक दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे उत्पादनात कमालीची घट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. असे असले तरी ग्रामपंचायत निवडणूक असलेल्या गावांमध्ये उमेदवार आणि पॅनेलप्रमुखांनी खर्चाचा हात ढिला केला असल्याची बाब चर्चेचा विषय ठरत आहे. यातून गावोगावी होणाऱ्या आर्थिक उलाढालीचे आकडे वाढत जात असल्याने तालुकास्तरावरील नेत्यांचेही तोंडचे पाणी पळविले आहे. दरम्यान, एकीकडे आर्थिक उलाढाल हा महत्त्वाचा विषय असताना दुसरीकडे बामखेडा (ता. शहादा) येथील एका पॅनेलच्या प्रमुखांनी वेगळा पायंडा पाडून सर्वांना चकीत केले आहेत. पॅनेलप्रमुखांनी गावात ११ सदस्यांच्या हस्ते प्रत्येकी एक अशी ११ झाडे लावली आहेत. या वृक्षांची लागवड केल्यानंतर त्यांनी गावात प्रचार सुरू केला आहे. याच गावात एका पॅनेलमध्ये उच्चशिक्षित उमेदवारांचीही संख्या अधिक असून, यातील पती-पत्नी ग्रामस्थांचे आकर्षण ठरत आहेत.

तालुक्यात एकूण २७ पैकी सहा ग्रामपंचायती ह्या बिनविरोध झाल्या होत्या. या सहा ग्रामपंचायतीतील २३ प्रभागांत बिनविरोध सदस्य निवडून आले आहेत. यामुळे १५ रोजी २१ ग्रामपंचायतींच्या ६६ प्रभागांत निवडणूक कार्यक्रम होणार आहे. या ६६ प्रभागांमध्ये ४१ हजार ५७० मतदार मतदान करणार असल्याने त्यादृष्टीने प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे. 

Web Title: In such a hurry to ask for votes for the candidates, they went to the fields behind the voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.