प्रकाशातील केदारेश्वर मंदिरात शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 13:08 IST2020-07-28T13:08:51+5:302020-07-28T13:08:57+5:30
नरेंद्र गुरव । लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा ता़ शहादा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या केदारेश्वराचा दरबार पहिल्या श्रावण ...

प्रकाशातील केदारेश्वर मंदिरात शुकशुकाट
नरेंद्र गुरव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा ता़ शहादा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या केदारेश्वराचा दरबार पहिल्या श्रावण सोमवारीही बंद आहे़ इतिहासात प्रथमच श्रावणी सोमवार असताना मंदिर बंद असल्याने भाविकांनी लांबूनच दर्शन घेत ‘संपूर्ण विश्व कोरोनामुक्त होवून सुखरूप राहू दे’ अशी प्रार्थना केली़
दरम्यान दरवर्षी श्रावणात येथे हजेरी लावणारे कावडधारक आणि त्यांच्या तोंडून निघणारा हरहर महादेवचा गजर यंदा कोरोनामुळे बंद होता़
दुसरीकडे पहिल्या श्रावणी सोमवारी कानुमातेच्या विसर्जनानिमित्त शेकडोंच्या संख्येने येणारे भाविक, कानुमातेचे अहिराणी गीतांमधून गुणगान करत दिला जाणारा निरोप आणि नदी पात्रातील माणसांच्या गर्दीवरही अंकुश बसला आहे़ प्रथमच पसरलेल्या शुकशुकाटामुळे दक्षिण काशी प्रकाशा येथील विविध मंदिरांचा परिसर श्रावणात प्रथमच निस्तेज दिसून आला़
मंदिरे लॉकडाऊनच़़
केदारेश्वराचे दर्शन घेणारे भाविक काकडआरतीला प्राधान्य देतात़ परंतु भाविकांसाठी मंदिर बंद असल्याने साधेपणाने आरतीपूजन करण्यात आले़ पुजारी आणि मंदिराची देखभाल करणारे अशा दोघांनीच केदारेश्वरची पूजा करुन आरती केली़ मंदिर परिसरात होणारी रामधून लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सद्गुरु धर्मशाळेतून सुरू करण्यात आली आहे़ तेथे चार-चार भाविकांचे गट रामधून करत आहेत़ प्रकाशा ग्रामपंचायतीने कोरोनामुळे भाविकांना गावात येण्यास मनाई केली आहे़ याबाबतचा संदेश सोशल मिडियातूनही प्रसारित करण्यात आला होता़ सकाळी मंदिराचे विश्वस्त आणि आणि ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांनी या भागात भेट देत पाहणी केली होती़
लॉकडाऊनमुळे परिसरातील पूजा साहित्य, रसवंती, खाद्यपदार्थ विक्रेते यांची दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत़ यामुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे़ काही भाविक याठिकाणी सत्यनारायण पूजा, भंडारा यांचे आयोजन करत होते़ यंदा ते सर्व बंद असल्याने परिसरावर अवकाळा आली होती़ मंदिर परिसरामध्ये बेल, फूल, नारळ, पूजेचे साहित्य, प्रसाद आदींचेदुकाने थाटण्यात येतात़ परंतु चार महिन्यांपासून मंदिर बंद असल्याने सुमारे ४० व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे़ श्रावण महिना हा व्यावसायिकांसाठी खास असतो़ परंतु पहिल्याच सोमवारी मंदिर बंद असल्याने रोजगार बुडाल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली़
मंदिर परिसरात रात्री उशिरापर्यंत होणाऱ्या गर्दीमुळे परिसर रोषणाई उजळून निघत होता़ लॉकडाऊनमुळे हे सर्व बंद करण्यात आले आहे़ पूजनासह विविध धार्मिक उपक्रम बंद असल्याने गुरव (अर्चक ), पुजारी, ब्राह्मणांसह परिसरातील दुकानदारही श्रावण सोमवार असताना घरीच थांबून होते़ या भागात उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कैलास माळी यांच्यासह प्रकाशा पोलीस दूरक्षेत्राचे कर्मचारी, शहादा येथील पाच कर्मचारी, दहा होमगार्ड असे पंधरा जणांना मंदिर परिसरात तैनात करण्यात आले होते. दिवसभर पोलीस, होमगार्ड या ठिकाणी थांबून होते.
४दक्षिण काशी प्रकाशा येथे केदारेश्वर, काशीविश्वेश्वर, पुष्पदंतेश्वर, संगमेश्वर, गौतमेश्वर यासह विविध देवतांची मंदिरे आहेत़ श्रावणात या मंदिरांमध्ये दर्शन घेण्यापूर्वी सूर्यकन्या तापी नदीत स्रान करण्यासाठी भाविकांची गर्दी होते़
४स्रानानंतर सर्व मंदीरात दर्शनानंतरही भाविक याच भागात हजेरी लावत असल्याने केदारेश्वर परिसराला अक्षरश: यात्रेचे स्वरूप येते़ सकाळपासून केदारेश्वर परिसरात सुरू होणारी रामधून, काकडा आरती, पूजनासह विविध धार्मिक संस्कारांना मोठ्या थाटात प्रारंभ करण्यात येतो़
४ नजीकच्या गुजरात राज्यासह मध्यप्रदेश आणि खान्देशाच्या विविध भागातून भाविक श्रावण सोमवारनिमित्त भल्या पहाटेच येथे उपस्थित होत असल्याने परिसरात चैतन्य निर्माण होते़ लॉकडाऊनमुळे मात्र हे सर्व यंदा बंद आहे़
घाटावरील चित्र पहाटे पाच पासून
1 श्रावणाचा पहिला सोमवार असल्याने प्रकाशा येथे भाविकांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने पोलीस प्रशासनाने रविवार दुपारपासून केदारेश्वर मंदिर अणि परिसरात बंदोबस्त तैनात केला होता़ पहाटेपासून येथे स्रान आणि दर्शनासाठी गर्दी होण्याची शक्यता होती़
2 परंतु मंदिरे बंद असल्याची माहिती असल्याने पहाटे मंदीर परिसर आणि घाटावर शुकशुकाट होता़ यात नंदुरबार येथून आलेल्या कावडधारकांनी कावडमधून तापीचे जल नेल्याचे दिसून आले़ पहाटे चार ते पाच कावडधारक दिसून आले़
3 दरम्यान सकाळी साडेसहा वाजेनंतर नंदुरबार तालुक्यासह शहादा तालुक्याच्या काही भागातून कानुमाता विसर्जनासाठी काही कुटूंब अत्यंत साधेपणा आणि शांततेत याठिकाणी आले होते़ त्यांनी १० वाजेपर्यंत येथेच थांबून सोशल डिस्टन्सिंग करुन कानुमातेला निरोप दिला़ दुपारी १२ नंतरही घाटावर भाविकांची तुरळक गर्दी होती़ प्रकाशा गावातील भाविक खासकरून उपस्थित होते़
मंदिरांचे पुजारी आणि गावातील नागरिक यांची तुरळक संख्या होती़ दुपारी १ ते ५ यावेळेत मंदिर परिसर पूर्णपणे शांत होता़ सायंकाळी दरवर्षी होणारा भंडारा आणि रामधूनही बंद असल्याने गावातील भाविक घरून पूजा पाठ करत होते़
चार महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू असल्याने केदारेश्वर मंदिरसह प्रकाशा गावातील सर्व मंदिरे बंद आहेत़ श्रावण सोमवारी दक्षता म्हणून प्रकाशा गावच बंद ठेवण्यात आले होते़ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही दक्षता घेण्यात येत असल्याने ग्रामीण भागातून दर्शनासाठी आलेल्यांचा हिरमोडही झाला़ परंतु त्यांनी लांबूनच केदारेश्वर, पुष्पदंतेश्वर आणि गौतमेश्वराचे दर्शन घेतले़