अल्पवयीन मुलाला चाकूचा धाक दाखवत ९० हजारांचा मोबाइल केला लंपास

By मनोज शेलार | Updated: November 25, 2023 16:58 IST2023-11-25T16:57:49+5:302023-11-25T16:58:14+5:30

मुलगा घाबरलेला असल्याने १५ दिवसांनंतर पोलिसांत फिर्याद देण्यात आली.

rs 90000 mobile phone stolen by threatening a minor with a knife in nandurbar | अल्पवयीन मुलाला चाकूचा धाक दाखवत ९० हजारांचा मोबाइल केला लंपास

अल्पवयीन मुलाला चाकूचा धाक दाखवत ९० हजारांचा मोबाइल केला लंपास

मनोज शेलार, नंदुरबार : अल्पवयीन मुलाच्या गळ्याला चाकू लावून त्याच्याकडून ९० हजार रुपयांचा मोबाइल घेऊन एकाने पोबारा केल्याची घटना नवापूर येथील शाळेच्या पटांगणात रात्रीच्या वेळी घडली. मुलगा घाबरलेला असल्याने १५ दिवसांनंतर पोलिसांत फिर्याद देण्यात आली.

पोलिस सूत्रांनुसार, १६ नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता मंगलदास पार्क भागातील एक १३ वर्षीय मुलगा त्याच्या इतर साथीदारांसोबत दिवाण हायस्कूलच्या पटांगणात होते. त्यावेळी त्यांच्यातील एकाची बोटातील अंगठी पडल्याने ती मोबाइलच्या बॅटरीच्या उजेडात शोधत होते. त्यावेळी तेथे २२ वर्षीय युवक आला. त्याने मुलाच्या गळ्यावर चाकू ठेवून धमकी देत त्याच्या हातातून ९० हजार रुपये किमतीचा मोबाइल घेतला. त्यानंतर संधी साधत अंधारात तो तेथून पळून गेला. या घटनेने मुलाच्या मनावर परिणाम झाला. तो आजारी पडला. त्याच्या मनातील भीती दूर करून त्याला त्याच्या पालकांनी पोलिसांकडे नेऊन याबाबत फिर्याद दाखल केली. त्यावरून २२ वर्षीय अज्ञात युवकाविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक विशाल सोनवणे करीत आहेत.

Web Title: rs 90000 mobile phone stolen by threatening a minor with a knife in nandurbar