Rs 2 crore works in 'water' in Khapar forest area | खापर वनक्षेत्रात 2 कोटी रुपयांची कामे ‘पाण्यात’

खापर वनक्षेत्रात 2 कोटी रुपयांची कामे ‘पाण्यात’

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अक्कलकुवा वन परिक्षेत्र कार्यालयांतर्गत खापर वनक्षेत्रात  रोपवनासाठी पूर्व पावसाळी कामे पूर्ण न करताच बिलांची वसुली करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आह़े 2015-16 मध्ये 81 लाख तर 2017-18 या वर्षात 1 कोटी 15 लाख 95 हजार रुपयांच्या या कामांची स्थिती अत्यंत दयनीय असल्याचे समोर आले आह़े      
अक्कलकुवा तालुक्यातील खापर वनक्षेत्रात वनविभागाने रोहयोंतर्गत रोपवनांच्या कामांचे नियोजन केले होत़े  2015-16 आणि 2017-18 या दोन वर्षात करण्यात आलेली कामे झालेलीच नसल्याचा दावा तालुक्यातून गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आह़े याबाबत पाठपुरावा करण्यात येत आह़े अनेक ठिकाणी कामेच झालेली नसल्याचे तर काही ठिकाणी नावालाच कामे करण्यात आल्याचा दावा होत आह़े या सर्व कामांसाठी सुमारे 2 कोटी  रुपयांचा निधी हा वेळोवेळी खर्च करण्यात आला आह़े विशेष बाब म्हणजे वनविभागाने या सर्व कामांसाठी नियुक्त केलेल्या मजूरांना दोन वर्ष उलटूनही मजूरी मिळालेली नाही़ मजूरांचे खाते असलेल्या कोराई (खापर) येथील बँक ऑफ महाराष्ट्र आणि सेंट्रल बँकेत दर दिवशी ते चकरा मारत आहेत़ 
वनविभागाने नियुक्त केलेल्या मजूरांना शासन नियमाप्रमाणे 296 रुपये मजूरी देणे गरजेचे असताना त्यांना 196 रुपये मजूरी देण्यात आल्याने उर्वरित 100 रुपयांचे, काय असा प्रश्न निर्माण झाला आह़े या मजूरांना येत्या महिन्यात मजूरीची रक्कम देण्यात येणार असल्याचे वनविभागाने म्हटले असून यासाठी जिल्हाधिकारी यांनी 2 कोटी रुपयांचा निधी दिल्याचे सांगण्यात आले आह़े रोपवनातील पूर्व पावसाळी कामे, जागा सफाई, खड्डे आखणे, खड्डे खोदणे, बुरुज सिमेंट बंधारे, साफसफाई करणे, जाड रेषा टाकणे या कामांबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े 


2015-16 या वर्षात मोरंबा येथे नाला बांधसाठी 1 लाख 10 हजार, भराडीपादर येथे नाला बांध 1 लाख 40 हजार, खडकापाणी येथे जेएफएमसाठी 6 लाख तर होराफळी येथे 4 लाख 75 हजार, ओहवा येथे बांबू लागवडीसाठी 3 लाख 30 हजार, खाई येथे 3 लाख 50 हजार, जांबापाणी येथे खैर लागवड 7 लाख 50 हजार, मोरंबा येथे 7 लाख 50 हजार, कुंडी येथे घायपात लागवड 1 लाख 50 हजार, कुवा 70, रामपूर येथे भरीव वनीकरणासाठी 7 लाख 10 हजार, दगडी बुरुज 6 लाख 70 हजार तर माती बांधसाठी (ससप्र) 30 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत़ या कामांची स्थिती अत्यंत गंभीर असल्याचे चित्र आह़े सोबत 2017-18 या वर्षात रोपवनांच्या कामांबाबत अनियमिता असल्याचे सांगण्यात आले आह़े यात मोरंबा येथे 20 हेक्टर, कुंडी 20 हेक्टर, गव्हाळी 25 हेक्टर, रतनबारा 10 हेक्टर, जांभापाणी 20 हेक्टर, कोठली, ओहवा व खाई येथे प्रत्येकी 25 हेक्टर तर होराफळी व खडकापाणी येथे 25 हेक्टर रोपवनांबाबत तक्रारी आहेत़ 

खापर परिसरातील दसरापादर येथे रोपवाटिकांची कामे घेण्यात आली होती़ याठिकाणी माती भरलेल्या पिशव्या कोराई नदीच्या पुरात वाहून गेल्याचे सांगण्यात आले आह़े परंतू प्रत्यक्षात रोपे असलेल्या नर्सरीचे पंचनामे करण्यात आली होती़ यातून नुकसानभरपाईची वसुली झाल्याची माहिती समोर आली आह़े असे प्रकार तालुक्यात इतर घडल्याचे सांगण्यात येत आह़े 
 

Web Title: Rs 2 crore works in 'water' in Khapar forest area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.