Rare species found in Thanepada | ठाणेपाड्यात आढळले दुर्मिळ प्रजातीचे ‘काळवीट’

ठाणेपाड्यात आढळले दुर्मिळ प्रजातीचे ‘काळवीट’

भूषण रामराजे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरापासून अवघ्या २० किलोमीटर अंतरावर असलेल्या ठाणेपाडा वनक्षेत्रात ब्लॅक बक हे दुर्मिळ प्रजातीचे काळवीट आढळून आले आहे़ गेल्या १०० वर्षात या वनक्षेत्रात काळविटाची कोणतीही नोंद नसताना अचानक हा प्राणी समोर आल्याने ठाणेपाडा वनक्षेत्र वन्य प्राण्यांसाठी सुरक्षित होत असल्याचे स्पष्ट होत आहे़
वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ठाणेपाडा वनक्षेत्रात हरीणवर्गीय प्राणी फिरत असल्याचे दिसून आले होते़ त्याच्या पाऊल खुणा आणि वर्णन याची पडताळणी केल्यानंतर मादी काळवीट असल्याचा उलगडा झाल्यानंतर वनविभागाने आनंद व्यक्त केला होता़ अचानक आलेले हे काळवीट स्थलांतरीत असावे असा अंदाज आहे़ गेल्या काही वर्षात ठाणेपाडा वनक्षेत्रात स्थानिक लोक, संयुक्त वन व्यवस्थापन समिती आणि वनविभाग यांच्या वन व्यवस्थापनामुळे वन्यजीवांच्या वेगवेगळ्या प्रजातींचे प्रमाण वाढत आहे़ ठाणेपाडा वनक्षेत्र हे शुष्क प्रदेशाचा एक भाग आहे़ त्यातून येथे गवतवर्गीय वनस्पतींची वाढ झाल्याने तृण भक्षी प्राण्यांचा संचार सुरु झाल्याची माहिती देण्यात आली आहे़ यातूनच काळवीट येथे आले असावे असा अंदाज आहे़ दुर्मिळ असा हा प्राणी आढळून आल्यानंतर वनविभागाने तातडीने ठाणेपाडा, अजेपूर तसेच नवापुर तालुक्यातील गावांमध्ये बैठका घेऊन ‘लोकसंवाद’ हा कार्यक्रम घेणार या माध्यमाने उन्हाळ्यात येथे स्थलांतरित होणाºया प्राण्यांची सुरक्षितता आणि वनक्षेत्रात वणवा पेटू नये यासाठी घेण्यात येणारी दक्षता याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे़ सहायक वनसंरक्षक जी़आऱ रणदिवे हे त्या-त्या गावांमध्ये जाऊन ग्रामस्थांसोबत संवाद साधणार असून वन्यप्राणी संवर्धनासाठीच्या उपायांची माहिती देतील़


आढळून आलेले काळवीट हे ब्लॅक बक या दुर्मिळ प्रजातीतील आहे़ १९७२ व्या वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत ब्लॅक बक हा प्राणी श्रेणीमध्ये अतीसंरक्षित आहे़ त्याची शिकार केल्यास आजन्म कारावासासारख्या शिक्षेची तरतूद आहे़ प्रामुख्याने शुष्क प्रदेशातील ओसाड माळरानावर फिरणारा काळवीट अहमदनगर जिल्ह्यातील रेहेकुरी काळविट अभयारण्यात तसेच पुणे, सोलापूर जिल्ह्यात आढळतो़ त्याव्यतिरिक्त आता नंदुरबारात ही दुर्मिळ प्रजाती आढळली आहे़ साधारण ३६ किलो वजन व १़२ मीटर लांबी असलेला हा प्राणी त्याच्या शिंग आणि चामड्यासाठी प्रसिद्ध असल्याने संरक्षित म्हणून गणला जातो़ आढळून आलेली काळवीट ही मादी असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे़ भुऱ्या रंगाची विना शिंगाची मादी तर काळ्या रंगाचा मोठी शिंगे असलेला नर असतो़ या प्राण्याला अत्यंत संरक्षित म्हणून केंद्र शासनाने यापूर्वीच घोषित केले आहे़

मुख्यत्त्वे करुन गवत, फळ, फुले यासह विविध वनस्पती हे या ब्लॅक बकचे मुख्य अन्न आहे़
दरम्यान ठाणेपाडा येथील जिल्हा परिषद सदस्य देवमन पवार यांनीही या प्रजातीच्या आढळून येण्याबाबत आनंद व्यक्त केला असून वनव्यवस्थापन समित्या त्याच्या संरक्षणासाठी वनविभागाला सहकार्य करणार असल्याचे म्हटले आहे़
ठाणेपाडा वनक्षेत्रात यापूर्वी काळवीटांचा रहिवास असल्याचे परिसरातील ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे़ १८ व्या शतकात येथे काळवीट अस्तित्त्वात असल्याचे सांगण्यात आले आहे़

Web Title: Rare species found in Thanepada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.