अडथळा नसताना संरक्षक भिंत पाडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 13:04 IST2020-11-06T13:04:15+5:302020-11-06T13:04:21+5:30
n लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : शहादा तालुक्यातील डामरखेडा येथे रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी अडथळा न ठरणारी अष्टविनायक गणेश मंदिराची ...

अडथळा नसताना संरक्षक भिंत पाडली
n लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : शहादा तालुक्यातील डामरखेडा येथे रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी अडथळा न ठरणारी अष्टविनायक गणेश मंदिराची भिंत व पाण्याची टाकी संबंधित ठेकेदाराने तोडून टाकली. ठेकेदाराची ही चूक मंदिराच्या ट्रस्टींनी लक्षात आणून दिल्यानंतर भिंत बांधून देण्याचे ठेकेदाराने सांगितले. मात्र सहा महिन्यानंतरही काम होत नसल्याने मंदिरांच्या ट्रस्टींनी सांर्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे तक्रार केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, डामरखेडा, ता.शहादा येथे रस्त्यालगत अष्टविनायक गणेश मंदिर आहे. कोळदा ते सेंधवा या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू असताना संबंधित ठेकेदारच्या मजुरांनी रस्त्याच्या कामासाठी कोणतीही अडचण नसताना मंदिराच्या गेटजवळील संरक्षण भिंत व पाण्याची टाकी जेसीबीने तोडून टाकली. वास्तविक रस्ता, गटार व त्यानंतर आठ ते नऊ फुट अंतरावर मंदिराचे गेट आहे. असे असतानाही संरक्षक भिंत व पाण्याची टाकी तोडल्याने भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. ही चूक मंदिर ट्रस्टींनी रस्ता बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराच्या फौजी नामक व्यवस्थापकाच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर त्यांनी तुम्हास भिंत बांधून देऊन असे तोंडी आश्वासन दिले. मात्र सहा महिने उलटूनही त्याची दखल घेतली गेली नाही उलट गटारीचे खोदकाम केल्यानंतर निघालेली माती मंदिर परिसरातच टाकण्यात आली आहे. त्यामुळे मंदिर परिसरातील नैसर्गिक सौंदर्य खराब झाले असून मंदिराची साफसफाई तथा इतर कामांसाठी अडचण येत आहे. सहा महिने होऊनही काम न झाल्याने मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी नंदुरबार व प्रांताधिकारी शहादा यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.