बोकडला मारल्याच्या वादातून झालेल्या मारहाणीत वृद्धेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 12:23 IST2019-09-18T12:23:26+5:302019-09-18T12:23:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शेतात घुसलेल्या बोकडला रखवालदाराने मारल्याच्या कारणातून झालेल्या मारहाणीत वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी ...

बोकडला मारल्याच्या वादातून झालेल्या मारहाणीत वृद्धेचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शेतात घुसलेल्या बोकडला रखवालदाराने मारल्याच्या कारणातून झालेल्या मारहाणीत वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री नवलपूर, ता.शहादा येथे घडली. याबाबत तिघांविरुद्ध शहादा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लिलाबाई सन्या ठाकरे असे मयत वृद्धेचे नाव आहे. किसन वनसिंग ठाकरे, जंगल्या काल्या वळवी, इसन वनसिंग ठाकरे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनुसार, तुषार अजरून ठाकरे हा युवक गावात शेळ्या चारण्याचे काम करतो. गावालगतच्या शेतात बोकड घुसून कापसाचे नुकसान झाले म्हणून तेथील रखवालदार जंगल्या काळ्या वळवी याने बोकडला दगड मारून किसन ठाकरे यास हटकले. ही बाब किसन याने घरी सांगितली. त्याचा जाब विचारण्यासाठी विशाल अजरुन ठाकरे, अजरुन गणेश ठाकरे हे जंगल्या वळवी याच्याकडे गेले. त्यांच्यात वाद होऊन शिविगाळ झाली. नंतर मारहाण देखील झाली.
यावेळी जंगल्या ठाकरे याच्याकडील काहींनी अजरून ठाकरे यास मारहाण सुरू केली. त्याला सोडविण्यासाठी गेलेल्या लिलाबाई सन्या ठाकरे यांना छातीवर मार लागल्याने त्या जागीच कोसळल्या. त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषीत केले.
याबाबत विशाल ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किसन वनसिंग ठाकरे, जंगल्या काल्या वळवी, इसन वनसिंग ठाकरे यांच्याविरुद्ध शहादा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांना अटक करण्यात आली आहे. तपास पोलीस निरिक्षक किसन पाटील करीत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.