ना रस्ता, ना रुग्णवाहिका, जंगलातच झाली प्रसूती; नंदुरबारमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2023 07:42 IST2023-07-06T07:41:09+5:302023-07-06T07:42:05+5:30
वंतीबाई आबला वसावे असे मातेचे नाव आहे.

ना रस्ता, ना रुग्णवाहिका, जंगलातच झाली प्रसूती; नंदुरबारमधील घटना
-किशोर मराठे
वाण्याविहीर (जि. नंदुरबार) : सातपुड्यात रस्त्याअभावी रुग्णालयात झोळी अर्थात ‘बांबूलन्स’मधून नेण्यात येणाऱ्या गर्भवतीला कळा अनावर झाल्याने तिची प्रसूती पळसाच्या झाडाच्या आडोशाला झाल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी घडला आहे. अक्कलकुवा तालुक्यातील बोडीपाडा येथील ही माता असून, बोडीपाडा ते दसरापादर असा तीन किलोमीटरचा रस्ता नसल्याने तिची प्रसूती झाडाखाली करण्याची वेळ कुटुंबीयांवर आली. वंतीबाई आबला वसावे असे मातेचे नाव आहे.
वंतीबाई यांच्या पोटात दुखत असल्याने त्यांना झोळीतून पती आबला वसावे हे गावातील युवक आणि नातेवाईकांच्या मदतीने दसरापादर येथे आणत होते. आंबाबारी गावाजवळ जंगलात मातेला प्रसवकळा अनावर झाल्या होत्या. पती आबला राशा वसावे व दायी बोंडीबाई रावजी तडवी, किलाबाई बिज्या वसावे यांनी पळसाच्या झाडाच्या आडोशाला महिलेची प्रसूती करण्याचा निर्णय घेतला होता. जोखीम पत्करून महिलेची जंगलात यशस्वी प्रसूती केली.