कानशिलात लावल्याचा बदला खून करून घेतला!

By मनोज शेलार | Updated: November 1, 2023 17:42 IST2023-11-01T17:13:17+5:302023-11-01T17:42:35+5:30

याप्रकरणी तळोदा पोलिसात एकाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nandurbar : Man take Revenge by killing a person who slapped him in Taloda Nandurbar | कानशिलात लावल्याचा बदला खून करून घेतला!

कानशिलात लावल्याचा बदला खून करून घेतला!

नंदुरबार : काही दिवसांपूर्वी झालेल्या भानगडीत कानशिलात लगावल्याचा मनात राग धरून एकावर कुऱ्हाडीने वार करून ठार केल्याची घटना मोठा धनपूर, ता.तळोदा येथे सोमवारी रात्री घडली. याप्रकरणी तळोदा पोलिसात एकाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धरमसिंग नुऱ्या पाडवी (५५) रा.मोठा धनपूर, ता.तळोदा असे मयताचे नाव आहे तर कालुसिंग नुऱ्या पाडवी (४९) रा.मोठा धनपूर असे संशयीत आरोपीचे नाव आहे. पोलिस सूत्रांनुसार, धरमसिंग व कालुसिंग यांच्यात काही दिवसांपूर्वी तळोदा येथील चिनोदा चौफुलीवर भांडण झाली होती. त्यावेळी मयत धरमसिंग यांनी कालुसिंगच्या कानशिलात लगावली होती. त्याचा राग मनात धरून सोमवारी रात्री गावातच धरमसिंगला गाठून त्यांच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करून जखमी केले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत मधुकर रुता पाडवी यांनी फिर्याद दिल्याने कालुसिंग पाडवी विरुद्ध तळोदा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार महेश निकम करीत आहे.

Web Title: Nandurbar : Man take Revenge by killing a person who slapped him in Taloda Nandurbar