करार तत्वावरील उत्पन्नावरून पालिका सभेत खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 12:09 PM2020-03-01T12:09:28+5:302020-03-01T12:10:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नगरपालिकेने २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी १ कोटी ८६ लाख ८६ हजार ८६ रुपयांचा शिलकी ...

 The municipality will stand on the basis of contractual income | करार तत्वावरील उत्पन्नावरून पालिका सभेत खडाजंगी

करार तत्वावरील उत्पन्नावरून पालिका सभेत खडाजंगी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नगरपालिकेने २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी १ कोटी ८६ लाख ८६ हजार ८६ रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प मंजुर करण्यात आला. दरम्यान, नगरपालिचा मालकीच्या भाडेतत्त्वावर दिलेल्या इमारतींचे उत्पन्न कोट्यवधी रुपयांचे अपेक्षित असताना अर्थसंकल्पात कमी उत्पन्न दाखवल्याचा आरोप भाजपच्या नगरसेवकांनी केला. नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी मात्र त्याचे जोरदार खंडन करून विरोधकांचे आरोप फेटाळून लावले.
शनिवारी पालिकेचे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी सभागृहात सकाळी ११ वाजता या सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी होत्या़ मुख्याधिकारी तथा पीेठासिन अधिकारी डॉ़ बाबुराव बिक्कड यांनी अंदाजपत्रकाची माहिती सभागृहाला दिली़ यांतर्गत सभेत १० विषय मांडण्यात आले़ प्रारंभी २०१९-२० या र्थिक वर्षाचा सुधारित तसेच २०२०-२१ या वित्तीर्य वर्षाचा जमा आणि खर्चा अर्थसंकल्प स्थायी समितीने शिफारस केल्यानंतर मंजूर करण्यात आला़
नगरपालिकेने करार तत्वावर दिलेल्या वास्तूंवर व रोज बाजार शुल्क तसेच जाहिरात करापासून पालिकेला कोट्यावधींचे उत्पन्न अपेक्षित असतांना केवळ १४ लाख रुपये उत्पन्न अर्थसंकल्पात दाखवण्यात आल्याचा आरोप भाजपचे चारुदत्त कळवणकर व नगरसेवकांनी केला. जो पर्यंत सभागृहात या मुद्द्यावर सविस्तर चर्चा होत नाही तोपर्यंत अर्थसंकल्प सभागृहात मांडण्यात येऊ नये अशी भूमिका त्यांनी घेतली. नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी या आरोपाचे जोरदार खंडण केले. विरोधकांच्या आरोपाला त्याच आक्रमकपणे उत्तर दिल्याने विरोधकांनी घोषणाबाजी केली. त्यानंतर सभागृहात अर्थसंकल्प मांडून येऊन मंजुर करण्यात आला.
सभेत पालिका हद्दीत विकास परवानगी देण्यासाठी विकास नियंत्रण छाननी शुल्क दर आकारणे, इंदिरा गांधी नगरात १६० मिलीमीटर व्यासाची पाईप लाईन टाकण्याच्या कामास मुदतवाढ देण्यात आली. लोकनेते बटेसिंह रघुवंशी शॉपिंग कॉम्पलेक्स तळ मजला भाडे कराराने देणे. पालिका प्रशासकीय इमारत बांधकामाच्या कामाचे २३ कोटी १० लाख ३१ हजार रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर करण्यावर चर्चा झाली. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जलतरण तलाव देखभाल दुरुस्ती करता अभिकर्ता नियुक्ती या विषयांवर चर्चा करण्यात आली़
पालिकेकडून २०२०-२१ या वर्षासाठी १२७ कोटी ८६ लाख ८६ हजार ८८६ रुपयांच्या खर्चाचे अंदाजे जमा असल्याची माहिती सभागृहाला देण्यात आली़ यात १२६ कोटी रुपये हा वार्षिक खर्च असल्याने पालिकेकडे १ कोटी ८६ लाख ८६ हजार ८६ रुपये शिल्लक राहणार आहे़


येत्या वर्षात शहरात विविध उपक्रमांसह दलितवस्ती सुधारणा, रस्ते विकास, पाणीपुरवठा, गटारी, वैशिष्ट्यपूर्ण अनुदान योजना, नागरी आदिवासी वस्ती सुधारणा, अल्पसंख्यांक बहुल क्षेत्र विकास अनुदान, स्थानिक विकास निधी अनुदान, आवास योजना, स्वच्छ महाराष्ट्र अभियान नगरोत्थान, भुयारी गटारी, सौर ऊर्जा, नवीन प्रशासकीय इमारत बांधकाम यासह विविध विकासकामांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे़

 

Web Title:  The municipality will stand on the basis of contractual income

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.