नंदुरबारमध्ये बँक ऑफ इंडियाच्या शाखेला भीषण आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 13:29 IST2019-01-29T13:17:46+5:302019-01-29T13:29:47+5:30
अमर-अमृत चौकातील बँक ऑफ इंडियाच्या शाखेला आग लागून 11 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मंगळवारी (29 जानेवारी) पहाटेच्या सुमारास ही आग लागली होती.

नंदुरबारमध्ये बँक ऑफ इंडियाच्या शाखेला भीषण आग
नंदुरबार - शहरातील अमर-अमृत चौकातील बँक ऑफ इंडियाच्या शाखेला आग लागून 11 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मंगळवारी (29 जानेवारी) पहाटेच्या सुमारास ही आग लागली होती. बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून धूर येत असल्याचे परिसरातील नागरिकांना दिसले. मात्र त्यावेळी बँक बंद असल्याने नेमकी स्थिती समजून आली नव्हती. दरम्यान काही वेळाने बँकेच्या खिडकीतून आगीचे लोळ उठत असल्याचे नागरिकांना दिसले.
बँक अधिकारी व कर्मचारी यांना आगीची माहिती दिल्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले असले तरी बँकेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. महत्त्वाच्या कागदपत्रांसह 11 लाख 61 हजार रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. बँकेतील लॉकर रुम आणि कॅश सुरक्षित राहिल्याने मोठे नुकसान टळले. ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचे सांगण्यात येत असून पोलीस तपास सुरू आहे.